छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारसंघात बंडाचे निशाण फडकले आहे. अद्यापही महाविकास आघाडी व महायुतीमध्ये काही जागांवरुन वाद असल्याचे दिसून येते. त्यातच, शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मध्य मतदारसंघात किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर, येथील जागेवरुन शिवसेना शिंदे गटाने प्रदीप जैस्वाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघातून एमआयएमने नासेर सिद्दिकी यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे, येथील लढत तिरंगी होत असल्याचं दिसून येतंय. त्यातच, आता या मतदारसंघात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण, ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केलेल्या तनवाणी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे, ठाकरेंनी तनवाणी यांच्यावर कारवाई करत येथील उमेदवार बदलला आहे.
एमआयएमचा उमेदवार विजयी होऊ नये म्हणून माघार
छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात २०१४ सारखी परिस्थिती आहे, म्हणजे येथून एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून माघार घेत असल्याचे किशनचंद तनवाणी यांनी म्हटले आहे. जाहीर केलेल्या उमेदवाराने अचानक माघार घेतल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर, किशनचंद तनवाणी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील राजकारणात अनेक धक्के या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. त्यातच, उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी किंवा राजीनाम्याचे प्रकार घडत असताना, चक्क उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवाराने माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.