मुंबई : परतीच्या पावसानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्रातील तापमानात घट झाल्याने सकाळी हवेत गारवा जाणवत असून अनेक ठिकाणी धुक्यासह दव पडत आहे. सकाळचा गारठा वाढल्याने दुपारच्या उन्हाचा चटका तापदायक ठरतो आहे. मात्र राज्यात काही भागात अजूनही पावसाचे वातावरण (Environment Change) निर्माण होत असल्याचे चित्र आहे. (Weather Update)
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भासह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोमवारपासून राज्यात पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. परतीच्या पाऊस लांबल्याने हळूहळू किमान तापमानात घट होत आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील निचांकी तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मध्य महाराष्ट्रातील उत्तर भागात पारा १७ अंशांच्या खाली आला आहे. त्यामुळे थंडीची चाहूल अधिक जाणवू लागली आहे.
ढगाळ वातावरणामुळे आजार वाढण्याची शक्यता
परतीच्या पावसानंतर राज्यात सध्या ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आजारांचे प्रमाण वाढले आहे. मुंबई आणि पुण्यात ढगाळ हवामानामुळे लोकांमध्ये व्हायरल इन्फेक्शन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वातावरणातील या बदलामुळे खोकला, सर्दी, ताप, अस्थमा यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढले असून, गंभीर आजारांचे विषाणू पसरण्याची शक्यताही वाढली आहे.
तापमानातील घट, ढगाळ वातावरण आणि पावसामुळे शेतकरी वर्गासाठीही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. थंडीमुळे काही पिकांना फायदाच होईल. परंतु ढगाळ वातावरणाने आणि अचानक पडणाऱ्या पावसाने शेतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.