पल्लवी अष्टेकर
योजनाताई वावीकर व त्यांची लेक किमया या आमच्या घरी येण्याची वाट मी पाहत होते. एका रविवारी ४ वाजण्याच्या सुमारास माय-लेकी आमच्या घरी आल्या. थोडा वेळ गप्पा झाल्यावर किमयाने मला तिने बनविलेल्या सजावटीच्या रंगीबेरंगी गोष्टी दिल्या. त्यात दिवाळीचे दिवे, गौरीची पावले व शुभ लाभ यांचा समावेश आहे. मला तिचे खूप कौतुक वाटले. मग मी, किमया व योजनाताई गप्पा मारायला लागलो. किमया ही एक ‘डाऊन सिंड्रोम बेबी’ आहे. गोड, हसरी व नम्र. खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकून घेण्याची हौस तिला आहे.योजनाताई व त्यांचे पती उदय यांनी आपल्या लेकीवर भरभरून प्रेम तर केलेच, शिवाय आई-वडील कसे असावेत याचा एक आदर्श निर्माण केला आहे. योजनाताई मनमोकळेपणाने सांगू लागल्या, “आयुष्यात देवाने मला सर्वकाही मनाजोगतं दिलं होतं. कर्तृत्ववान पती, प्रेमळ माहेर व सासर, उत्तम स्वास्थ्य, आर्थिक सुबत्ता, कलागुणांना वाव देणारी नोकरी. नाही म्हणायला फक्त एकच उणीव होती-ती म्हणजे बाळाची”.लग्नानंतर तेरा वर्षांनी एक दिवस अचानक योजनाताईंना बाळाची चाहूल लागली आणि किमया जन्माला आली. तीन गुणसूत्र जोडले गेल्यामुळे गुणसूत्र दोषांसह जन्मलेले बाळ. हा धक्का पचवणे कुटुंबासाठी अवघड होते. योजनाताईही कोसळल्या, पण अगदी तात्पुरत्याच. त्यांनी मनात विचार केला की, “आता मीच हातपाय गाळून बसू? नाही, नाही, आता मी परिश्रम करणार, घाम गाळणार.” तेव्हा योजनाताईंनी परमेश्वराकडे प्रार्थना केली, तू विश्वासाने या बाळाला माझ्या झोळीत टाकले आहेस, बघं मी कशी किमया करून दाखवेन आणि योजनाताईंना आपल्या बाळाचे नाव सुचले – किमया. परमेश्वराकडे योजनाताईंनी प्रार्थना केली, “मी अफाट मेहनत करेन, पण किमयाने प्रतिसाद द्यायला पाहिजे. ती लोळागोळा होऊन पडली आहे व तिच्यात मी चेतना जागवण्याचा प्रयत्न करत आहे असे नको. एवढीच भीक घाल.”
या व्यक्तींना आरोग्याच्या विविध समस्या असू शकतात. योजनाताई व उदय यांनी बाळाच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या. क्रोमोसोमल चाचणीमध्ये किमयाला डाऊन सिंड्रोम असल्याचे पक्के झाले. योजनाताईंची बालरोगतज्ज्ञ बहीण डाॅ. दीपा कित्तूर यांचा बहुमूल्य सल्ला योजनाताईंना नेहमी मिळाला. डाॅ. दीपा यांचे पती डाॅ. दिनेश कित्तूर लहान मुलांचे सर्जन असल्याने त्यांनी किमयावर अनेक लहान – मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या. किमयाला हायपोटोनिया म्हणजे (लो मसल टोन) होता, म्हणजे तिच्या स्नायूंमध्ये जराही ताठरपणा नव्हता. त्यासाठी योजनाताई तिला दररोज फिजिओथेरपीसाठी नेत व घरीही त्यांनी सांगितल्यानुसार व्यायाम करावा लागे. या व्यक्तींमध्ये अद्वितीय क्षमता व स्वारस्ये असतात. त्यांचा बुद्ध्यांक कमी असू शकतो; परंतु त्यांच्याकडे प्रतिभा व सामर्थ्यही आहे. या व्यक्ती योग्य समर्थन व संधींसह व्यवस्थित जीवन जगू शकतात. मात्र समाजाने त्यांचा स्वीकार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे खूप जरूरीचे आहे. किमयाला योजनाताईंनी रेग्युलर शाळेत घातले. आपल्या प्रेमळ, निर्मळ, मृदू स्वभावाने किमयाने शाळेशी आपले नाते घट्ट केले. तिला इयत्ता दहावीत अडुसष्ठ टक्के गुण मिळाले. आज किमयाचे वय सत्तावीस वर्षे आहे. तिच्या शाळेतील मित्र-मैत्रिणींचा एक व्हाॅट्सअॅप ग्रुप आहे. तिच्या मित्र-मैत्रिणींशी तिचे आपुलकीचे नाते आहे, ते सर्वजणही तिची प्रेमाने चौकशी करतात. किमयाचे वडील उदय नामवंत वकील आहेत. लहान असताना किमयाच्या वैद्यकीय उपचारांचा व औषधपाण्याचा खर्च फार होता. मात्र योजनाताई म्हणतात की, “किमयाचा पायगुणच असा की, तिच्या वडिलांची वकिली अतिशय जोरात चालू झाली. त्यांची मते टीव्ही व वृत्तपत्रांतून नेहमी सादर होतात. या यशाचे श्रेय उदयजी आपल्या लेकीला देतात, जिने त्यांच्या करिअरला एक नवी दिशा दिली. किमयाची जीभ जड व लांब, उंच टाळू. यामुळे तिला अजिबात बोलता येत नव्हते. त्यामुळे स्पीच थेरपीचीही गरज भासली. आता किमया सर्वांशी आनंदाने संवाद साधते. तिचा आत्मविश्वास आता झळाळतो आहे. किमया व तिच्या आईसोबत मला तीन तास बसून बोलण्याची संधी मिळाली. त्यामुळे आम्हाला मनसोक्त गप्पा करायला मिळाल्या. किमया अतिशय उत्साहाने माझ्याशी गप्पा करत होती.
योजनाताईंनी किमयाच्या लहानपणापासून डाऊन सिंड्रोमवर अनेक पुस्तके वाचली. त्या ‘पेरेंटस् ऑफ डाऊन सिंड्रोम’ या संस्थेच्या सभासद झाल्या. यात इतर पालकांच्या अनुभवातून भरपूर शिकता आले. काय न कराव हे अधिक ठळकपणे समजले. योजनाताई किमयाला ऑक्युपेशनल थेरपीसाठी घेऊन जात.योजनाताईंनी एकदा अचानक ‘स्पेशल एज्युकेटर कोर्स’ची जाहिरात वाचली व आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि जुहूच्या दिलखूश स्पेशल शाळेत हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी त्या दाखल झाल्या. तेथे योजनाताईंना या कार्यक्षेत्रातील अनेक व्यावसायिक भेटल्यामुळे ज्ञानात खूप भर पडली. त्यांना अनेकविध प्रकारच्या मानसिक दिव्यांग मुलांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे किमया व अनेक बालकांच्या मदतीसाठी काम करायचे असे योजनाताईंनी ठरविले. या मुलांना विकसित करण्याच्या कामात त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. योजनाताई म्हणतात, “असंख्य कार्यक्रमांना मी किमयाला घेऊन जाते. तिच्याशिवाय कोणाला करमत नाही. माझ्या सासर-माहेरचे सर्व कुटुंबीय, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षिका, थेरपीस्ट, आमचे शेजारी या सर्वांच्या प्रेमाचा किमयाच्या वाटचालीत निश्चित वाटा आहे.”किमयाच्या भरतनाट्यमच्या एकूण आठ परीक्षा झाल्या आहेत. वेगवेगळ्या नृत्यांच्या कार्यक्रमात तिचा उत्साहाने सहभाग असतो. अमिताभ बच्चन यांच्या शो परफाॅरमन्समध्ये किमयाचा सहभाग होता. किमयाच्या नृत्याच्या कार्यक्रमांचे मला अनेक व्हीडिओज पाहायला मिळाले.किमयाने ‘अपेक्स नॅशनल लेव्हल बाॅडी शेफ’ हा सहा महिन्यांचा कोर्स पूर्ण केला. योजनाताईंनी किमयाला वाढविण्यात जराही कसूर सोडली नाही. हसत-हसत शिक्षण, खेळातून-गोष्टीतून शिक्षण, प्रेमातून शिक्षण व जीवनातून शिक्षण या सर्व पद्धती योजनाताईंनी अवलंबिल्या. बाजारातून सामान आणले की, त्याचे ग्रुपिंग करून ठेवणे, फ्रीजमधले सामान (बटर, चीज, भाज्या, दही वगैरे) फ्रीजमध्ये ठेवणे, कडधान्यांचे वर्गीकरण, बरण्यात भरून ठेवण्याचे वाणसामान, कपड्यांच्या घड्या घालताना वर्गीकरण, मॅचिंग गोष्टी, विरूद्धार्थी रंग, मऊ किंवा खरबरीत गोष्टी असे सर्व काही शिकविले. किमयाने संस्कृत विषयाच्या पहिल्या दोन परीक्षा उत्तम मार्कांनी उत्तीर्ण केल्या आहेत व आता तिची तिसऱ्या परीक्षेची तयारी सुरू आहे. जगा, प्रेम करा आणि हसा ही त्रिसूत्री किमयाने मला सांगितली. किमया पर्यावरणासाठी काम करते, ज्या पृथ्वीवर आपण रहातो, तिची काळजी घ्या, प्रदूषण टाळा, निसर्गाचे संवर्धन करा असा संदेश ती सर्वांना देते. एक लहानशी कविता किमयाबाबत आवर्जून सांगाविशी वाटते, “लोगोंने किमया में इतनी कमीया निकाली, की अब खूबियों के सिवाँ, उसमें कुछ बचाही नहीं!” ‘डाऊन सिंड्रोम फेडरेशन ऑफ इंडिया’ या संस्थेमध्ये किमया योद्धा म्हणून लेक्चर्स देते. ‘किमकॅन’ ही उद्योगशील संस्था किमया चालविते. किमया म्हणते, ‘‘ही अक्षमता नाही, तर क्षमता आहे.” आई-वडिलांच्या प्रेमाची पाखर भरभरून किमयाला मिळाली. ऑक्टोबर हा महिना ‘डाऊन सिंड्रोम अवेअरनेस मंथ’ म्हणून साजरा केला जातो. याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी आणि या लोकांमध्ये असलेले गुण, त्यांची वैशिष्ट्ये व त्यांनी मिळविलेले यश साजरे करण्याच्या उद्देशाने आहे. आपण सर्वजण किमयाला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया.