Tuesday, December 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘सुखके सब साथी...’

‘सुखके सब साथी…’

श्रीनिवास बेलसरे

लीपकुमार आणि सायरा बानोचा ‘गोपी’ आला १९७० साली. सिनेमात त्यांच्याबरोबर दोन दिग्गज मराठी अभिनेत्री होत्या- ललिता पवार आणि दुर्गा खोटे. त्याशिवाय सहकलाकार होते प्राण, ओमप्रकाश, निरूपा रॉय, फरीदा जलाल, जॉनी वॉकर, रामायण तिवारी आणि मुक्री. ‘गोपी’ हा एक रिमेक होता. मात्र तो हिंदीत इतका बेमालूनपणे चित्रित झाला होता की, कुणालाच असे वाटत नाही. बी. आर. पांथुलू यांनी कानडीत ‘चीन्नाडा गोम्बे’ या नावाने आणि तमिळमध्ये ‘मुरादन मुथू’ या नावाने एकाच वेळी चित्रित केलेल्या दोन चित्रपटांचा तो रिमेक होता. निर्माते होते टी. एस. मुथ्थूस्वामी आणि एस. एस. पलानीअप्पन. दिग्दर्शन होते ए. भीमसिंग यांचे! नंतर तीन वर्षांनी १९७३ मध्ये तो तेलुगूतही ‘पालेतुली चीन्नुडू’ या नावाने बनवला गेला. तेलुगूतले त्याचे नायक होते आंध्रच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांचे सासरे आणि प्रसिद्ध तेलुगू अभिनेते एन. टी. रामाराव. गोपीची सगळीच गाणी लोकप्रिय झाली. जुन्या रसिकांना आठवत असेल बिनाकात गीतमालावर ‘अकेलेही, अकेले चला हैं कहां?’, हे लतादीदींच्या नाजूक खोडकर आवाजातले गाणे, ‘जंटलमेन, जंटलमेन, जंटलमेन, मै हुं बाबू जंटलमेन, आ मिला ले मुझसे नैन, लंडनसे आया मैं बन ठनके’, किंवा ‘एक पडोसन पीछे पड गयी जंगली जिसका नाम’ आणि ‘रामचंद्र कह गये सियासे, ऐसा कलियुग आयेगा’, हे महेंद्र कपूर यांच्या खणखणीत स्वरातले गाणे, ही सर्वच गाणी बिनाकात गाजली. गोपीतले एक भजन मात्र राजेंद्रकृष्णन यांनी असे लिहिले होते की, वाटायचे एखाद्या संताचे जुने पदच दिग्दर्शकांनी उचलले असावे.स्व. महंमद रफीसाहेबांनी अत्यंत तल्लीन होऊन, भाविकपणे गायल्यावर ते भजन अजरामर होणार हे ठरलेलेच होते. त्यात कहर म्हणजे त्याला अतिशय कर्णमधुर संगीत दिले होते कल्याणजी, आनंदजी यांनी! गाण्याचे शब्द होते-

‘सुखके सब साथी, दुःखमें ना कोई.
मेरे राम, मेरे राम, तेरा नाम एक सांचा,
दूजा न कोई…’

राजेंद्रजींचे हे शब्दच असे होते की, ते दुरूनही नुसते कानावर पडले तरी हिंदी समजणारा कुणीही लगेच एका चिंतनशील मूडमध्ये जाऊ शकतो. कारण एकंदर विरक्तीचा आणि निर्मल भक्तीचा भाव हा आपल्या अनेक संतानी त्यांच्या रचनातून त्या पिढीच्या मनात आधीच रुजवलेला होता. अगदी परक्या व्यक्तीकडूनच काय, तर अनेकदा जवळच्या व्यक्तीकडूनही अपेक्षाभंग होण्याचा, फसविले जाण्याचा अनुभव कधी ना कधी प्रत्येकालाच आलेला असतो. त्यावर गाण्याची पहिलीच ओळ ‘सुखके सब साथी, दुखमे ना कोई’ प्रहार करते आणि आपण आपापल्या व्यक्तिगत अनुभवाच्या आठवणीत हरवतो. राजेंद्र कृष्णन लगेच आपल्याला त्या भावनेतून अध्यात्मिक विषयात घेऊन जातात. पावसाळ्याच्या सुरूवातीला आकाशात आलेले ढग वाऱ्यामुळे इकडून तिकडे तरंगत असतात. मध्येच उन्हाळ्याचा शेवटच्या दिवसातला सूर्यही तळपत असतो. त्यामुळे ढगांच्या सावल्या गावाबाहेरच्या मैदानात इकडून तिकडे धावताना दिसतात. त्यांची उपमा राजेंद्रजी जन्म आणि मृत्यूच्या खेळाला देतात. ते म्हणतात जशा त्या सावल्या क्षणिक असतात, जोराचा पाऊस आल्यावर ते ढग त्यांच्या सावल्यांचा खेळ, सूर्य सगळेच अदृश्य होऊन जाते तसेच जीवनाचे आहे. आज आहे, उद्या नाही. सगळी मायाच नाही, तर आपली स्वत:ची वाटणारी ही काया, ज्या शरीराने आपण जगात वावरतो, तेच मुळात नश्वर आहे, खोटे आहे. असे जीवनाच्या क्षणभंगुरतेला स्पष्ट करून राजेंद्रजी फक्त दोन ओळीत अख्खे भारतीय तत्वज्ञान बसवतात.
जीवन आनी-जानी छाया, झूठी माया, झूठी काया,फिर काहे को सारी उमरिया, पापकी गठरी ढोई? सुखके सब साथी…
ऐहिक जगातल्या घटनांचा कसला राग, लोभ धरून बसायचा? इथले सगळे शेवटी इथेच सोडून रिकाम्या हातानीच ‘वर’ जावे लागणार आहे. हे सांगताना गीतकारांनी सगळ्या जगण्यालाच दिलेली उपमा जबरदस्त आहे. राजेंद्रही म्हणतात अवघे जगणे एखाद्या बैराजी साधूने केलेल्या यात्रेसारखे आहे. त्याला कुठेच थांबता येत नाही, त्याचे कायम टिकणारे असे घर कुठेच नसते. शेवटी राजा असो की भिकारी, सगळ्यांचा अंत तर सारखाच होणार आहे! मग एवढी खटपट करून, बेईमानी करून, ही संपत्ती, कीर्ती, मिळवून उपयोग तरी काय? असा कबीरदासजींसारखा प्रश्न हे गाणे आपल्यापुढे उभा करते. जुने गीतकार सिनेमाच्या कथेत, तिच्यातील त्या विशिष्ट प्रसंगात समरस होतानाही असे काही लिहून जातात की, आपण तो सिनेमा इतिहासजमा झाल्यावरही कितीतरी वर्षे ते गाणे विसरू शकत नाही. कित्येकदा अशी गाणी आपल्याला उदास मन:स्थितीत मोठा सहारा देतात.

‘ना कुछ तेरा ना कुछ मेरा,
ये जग जोगीवाला फेरा,
राजा हो या रंक सभी का,
अंत एक सा होई. सुखके सब साथी…’

हे गाणे राजेंद्रजींनी एक भजन म्हणूनच लिहिले असल्याने त्यात त्यांनी स्वाभाविकपणे गुंफलेला अध्यात्मिक बोधही येतो. गाण्यातली त्यावेळची दृश्यही मोठी मनोवेधक आहेत. ज्यांनी लहानपणी खेड्यातल्या मंदिरात होणारी भजने, प्रवचने, कीर्तने ऐकली आहेत त्यांना ही दृश्य पाहताना जुन्या काळात परत गेल्याचा अनुभव येऊ शकतो. गाण्यात दिलीपकुमार मंदिरात जमिनीवर बसला आहे. सोबत तबलजी आणि इतर भक्त टाळ वाजवत त्याच्यामागे बसले आहेत. सर्वांच्याच चेहऱ्यावरचे निरागस भाव एक भक्तिमय, प्रसन्न वातावरण तयार करतात. देवासमोरच्या पितळी समईतील तीन-चार ज्योती मंदपणे तेवताना मध्येच वाऱ्याने डोलत आहेत. एरव्ही माणूस बाहेरच्या जगात सत्य शोधत बसतो. त्याला इतरांचे दोष चटकन दिसतात पण आपण आपल्याच मनात तो कधी डोकावत नाही. तो गंगेत स्नान करून उजळलेल्या देहाचा अभिमान धरतो पण मनातला मळ कधीच स्वच्छ करत नाही असे अंतर्मुख करणारे विचार कवी गाण्यात अलगद पेरतात आणि श्रोता विचारमग्न होऊन जातो.

“बाहरकी तू माटी फांके,
मनके भीतर क्यूं न झांके,
उजले तनपर मान किया,
और मनकी मैल न धोई
सुखके सब साथी, दुःख में ना कोई.”

अशी गाणी सिनेमा गीते म्हणून आपल्यासमोर आली तरी त्याकाळच्या गीतकारांच्या सांस्कृतिक श्रीमंतीमुळे तीच जणू नवी भजने ठरली. कधीतरी नवा कोलाहल, गोंधळ, अशांतता यातून मुक्तीचे चार क्षण अनुभवायचे असतील, मन शांत करायचे असेल, अंतिम सत्याचा निदान कवडसा तरी पाहायचा असेल तर त्यांना पर्याय नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -