Tuesday, December 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजसुखाचा शोध...

सुखाचा शोध…

गुरुनाथ तेंडुलकर

 सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ ही म्हण तुम्ही ऐकलीय ना? पण या म्हणीमध्ये नेमके तथ्य किती? मानवी जीवनात सुख अगदी थोडसे असून बाकी सगळे दुःखच दुःख आहे असे वाटण्याचे कारण काय? याचे कारण एकच… सुख आइस्क्रीमसारखे असते. पटकन वितळते आणि चटकन संपते. सुख उपभोगताना काळाचे भान राहात नाही. म्हणून सुखाचा कालखंड चटकन संपून गेल्यासारखा वाटतो. अगदी नेहमीच्या व्यवहारातील उदाहरण सांगायचे तर प्रवास कितीही लांबचा का असेना, त्या प्रवासात आपल्या आवडत्या माणसाची सोबत, संगत असेल तर वाट चटकन संपल्यासारखी वाटते. पिकनिकला जाताना असाच अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने घेतलेला असतो. वाट चटकन संपते याचे कारण अंतर कमी झाले असे नसते, तर आनंदाच्या उन्मादात वेळेचे भान उरत नाही म्हणून लवकर पोहचल्यासारखे वाटते. अगदी याच्या नेमके उलट म्हणजे, आपल्या अगदी जवळच्या कुणा माणसाला अपघात झाल्याची बातमी आली आणि सोबतीला कुणालाही न घेता आपण तिकडे निघालो तर मात्र तो प्रवास एकट्याने करताना वाट सरता सरत नाही. काळजीने खिन्न झालेल्या मनस्थितीत तेवढेच अंतर कापायला जास्त वेळ लागतो. म्हणजे वेळ तेवढाच लागतो. अंतर तेवढेच असते. पण ते अंतर संपता संपत नाही. ‘वाट सरता न सरणं.’ आणि ‘वाट कधी सरली हे न कळणं.’ या दोन्ही गोष्टी मनाच्या सापेक्ष वेगावर आणि त्याच्या विशिष्ट स्थितीवर अवलंबून असतात.‘सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे.’ असे म्हणण्यामागे असणारी मनोवृत्ती हीच असते.

सुख कितीही मिळाले तरी आणखी हवेच असते आणि दुःख मात्र बिलकूल नको हा मानवी स्वभावच आहे. मी कॉलेजात असताना आमच्या एका प्राध्यापकांनी वर्गात भिंतीवर एक पांढरा कागद भिंतीवर चिकटवला आणि त्यावर एक छोटासा काळा ठिपका काढून वर्गातील विद्यार्थ्यांना विचारले, ‘तुम्हाला काय दिसते?’ ‘आम्हाला काळा ठिपका दिसतो.’ आम्ही सर्वांनी उत्तर दिले. मग त्या प्राध्यापकांनी आणखी एक काळा ठिपका त्या कागदावर काढून विचारले, ‘आता काय दिसते?’ ‘आता दोन काळे ठिपके दिसतात.’ आम्ही सर्व विद्यार्थी कोरसमध्ये ओरडलो. ते प्राध्यापक हसून म्हणाले, ‘काय रे गधड्यांनो! तुम्हाला एवढा मोठा पांढरा कागद दिसला नाही? फक्त ते दोन काळे ठिपके तेवढे दिसले?’ सुख आणि दुःखाच्या बाबतीत नेमका हाच प्रकार होतो. कितीही मोठे असले तरी सुख चटकन जाणवत नाही, पण अगदी लहानात लहान दुःखदेखील अगदी भयंकर वाटते. सारखे लक्ष तिथेच जाते. आपल्या तोंडात बत्तीस दात असतात पण एखादी दाढ जर कधी काढावी लागली तर तिथे झालेल्या खड्ड्यांकडे जीभ पुन्हापुन्हा वळते. इतर एकतीस दातांकडे लक्ष न जाता, नसलेल्या त्या एका दाताकडे सगळे लक्ष केंद्रित होते. जे नाही. तेच नेमके हवेसे वाटते. म्हणून तर सारं ध्यान तिथेच जाते. ही आपली सर्वसामांन्यांची मनोवृत्तीच आहे. इंग्रजीत याला ‘सिलेक्टिव्ह व्ह्युईंग’ म्हणतात. आपण आपल्याला जे पाहायचे असते तेच पाहतो. आपल्या मनोवृत्तीनुसार आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बारीकसारीक घटनांचे अर्थ लावतो.

समर्थ रामदासस्वामींची एक कथा सांगतात. समर्थ रामदास स्वामी ‘प्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्र’ लिहीत होते. रावणाने सीतेला पळवून अशोकवनात ठेवली त्या प्रसंगाचे वर्णन समर्थ लिहित होते. त्यांनी लिहिले की, अशोकवनात सर्वत्र पांढऱ्या रंगांची फुले फुलली होती…! झालं…! समर्थांनी ही ओळ लिहिली मात्र आणि त्यांच्या पाठीमागच्या झाडावर बसून हे रामचरित्र वाचणारा मारुती एकदम खवळला. झाडावरून उडी मारून खाली उतरला आणि समर्थांच्या समोर उभा राहिला. मारुतीला समोर उभा पाहून समर्थ हसले आणि त्याला बसायची खूण केली. पण न बसता मारुती उभ्या उभ्याच म्हणाला…‘हे काय लिहिताय तुम्ही? अशोक वनात पांढऱ्या रंगाची फुले होती म्हणून? अशोकवनातील फुले तांबड्या रंगाची होती. मी… मी माझ्या डोळ्यांनी पाहिलीत ती फुले.’ समर्थ शांतपणे स्वतःशीच हसले अन् म्हणाले, ‘अशोकाची फुले तांबडी कशी असतील? अशोकाला जी फुले येतात ती पांढऱ्याच रंगाची असतात…’ ‘काहीतरी बोलू नका. सीतामाईंचा शोध घ्यायला मी स्वतः त्या वनांत गेलो होतो. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. फुले तांबड्याच रंगाची होती.’ मारुती तावातावाने भांडायलाच उठला. मारुतीचा तो टीपेला पोहचलेला आवाज ऐकून सीतामाई स्वतः पुढे झाल्या आणि म्हणाल्या, ‘थांबा, भांडू नका. मी सांगते. ती फुले पांढऱ्या रंगाची होती.’ ‘काय?’ मारुती जवळजवळ किंचाळलाच. ‘सीतामाई, काय सांगताय तुम्ही? अहो मी स्वतःच्या डोळ्यांनी…’ ‘हो रे हनुमंता, तू पाहिलेली फुले तुला तांबड्या रंगाची दिसली. पण ती फुले खरोखरच पांढऱ्या रंगाचीच होती.’ मारुतीच नव्हे तर समर्थदेखील आता चक्रावले. सीतामाई पुढे म्हणाल्या, ‘अरे हनुमंता, तू जेव्हा अशोकवनात मला शोधायला आला होतास ना त्यावेळी मी रावणाच्या कैदेत होते, राक्षशिणींच्या गराड्यात होते. आपल्या सीतामाईला अशाप्रकारे कैदेत डांबलेले पाहून तू संतापलास. त्यावेळी संतापाने लालीलाल झालेल्या तुझ्या डोळ्यांना अशोकवृक्षाची फुले पांढरीशुभ्र असूनही तांबडी लाल दिसली. ती फुले वास्तवात पांढरीच होती… अशोक वृक्षाची फुले पांढरीच असतात…’ सीतामाईंनी मारुतीला समजावले. शांत झालेला मारुती पुन्हा आपल्या जागेवर बसला.

समर्थांनी पुढचा भाग लिहायला सुरुवात केली. ही झाली एक कथा. पण प्रत्यक्षातही अशा गोष्टी घडतात. आपल्यालाही असेच अनुभव येतात. `मला असे वाटले…!’ असे आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपल्याला जे पाहायचे असते तेवढेच आपण पाहिलेले असते. जे ऐकावेसे वाटते तेवढाच भाग आपण ऐकलेला असतो. कुणाचेही नीट पूर्णपणे ऐकून न घेता आपण आपल्या मनस्थितीनुसार आपल्याला हवे तेवढेच बघतो. ऐकतो. आपल्याला जे खरे वाटते तेच खरे मानतो. त्यामुळे अनेकदा रामायणाचे रुपांतर महाभारतात होते. आपली नजर तांबरलेली असते म्हणून ती फुले तांबडी दिसतात, भले त्यांचा रंग पांढरा असला तरीही. दुःखाकडेच पाहाये ठरले तर सुखाचा पर्वत समोर असूनही त्याकडे लक्ष जात नाही. पण राईएवढे किरकोळ दुःख मात्र सलते. ठुसठुसते. त्या राईएवढ्या दुःखाला कुरवाळत रडत बसायचे? की सुखाच्या पर्वतावर चढून आपले क्षितिज विस्तारायचे हाच खरा प्रश्न…या प्रश्नाचे उत्तर कवीवर्य मंगेश पाडगावकर एका बोलगाण्यातून देतात…सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत ? तुम्हीच ठरवा. सुख आणि दुःख या दोघांपैकी कुणाची निवड करायची याचा `चॉईस’ नेहमी आपल्याच हातात असतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -