महाभारतातील मोतीकण – भालचंद्र ठोंबरे
महाभारतातील एक बहुचर्चित व्यक्तिमत्त्व, भीष्माच्या मृत्यूस अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरलेला योद्धा व राजा द्रुपदचा मुलगा, धृष्टद्यूम्न व द्रौपदीचा भाऊ शिखंडी. पूर्वजन्म – काशीच्या राजाला (काशीराजला) तीन मुली होत्या. अंबा, अंबिका, अंबालिका. पैकी मोठी अंबा व शाल्व राजाचे एकमेकांवर प्रेम होते व त्यांनी विवाह करण्याचे ठरविले. तिघींचेही स्वयंवर एकाच वेळी होणार असून स्वयंवराच्या वेळी अंबा शाल्व नरेशला माळ घालणार असे त्यांचे ठरले होते. मात्र स्वयंवराच्या वेळीच पितामह भीष्म त्या ठिकाणी पोहोचले व उपस्थित सर्व राज्यांना पराभूत करून तीनही बहिणींचे हरण केले. कौरववंशीय विचित्रविर्याशी त्यांचा विवाह करण्याचे ठरविले. अंबाने सत्य परिस्थिती सांगितल्यावर भीष्माने तिला मोठ्या सन्मानाने शाल्व नरेशाकडे पाठविले. मात्र भीष्मांकडून पराभूत झालेल्या शाल्व राजाने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला व परत भीष्माकडे जाण्यास सांगितले.
दोन्ही बाजूंनी नकार आल्याने असहाय्य झालेल्या अंबेने भीष्माचे गुरू परशुराम यांना मदतीची याचना केली. परशुरामाने भीष्माला अंबाशी विवाह करण्यास सांगितले; परंतु भीष्माने नम्रपणे नकार दिला. तेव्हा परशुराम व भीष्म यांच्यामध्ये २३ दिवस युद्ध झाले. या युद्धात कोणाचाही जय पराजय झाला नाही. अखेर देवांच्या मध्यस्थीने हे युद्ध थांबले. परशुराम अंबेचा भीष्माशी विवाह करून देऊ शकले नाहीत. सर्व बाजूंनी निराश झालेल्या अंबाला भीष्माचा अत्यंत राग आला. तिने महादेवांची तपश्चर्या करून शिव प्रसन्न झाले. तेव्हा तिने भीष्मांच्या मृत्यूचे वरदान मागितले. शिवाने ते मान्य करून तिला पुढील जन्मात प्रथम कन्या म्हणून जन्म घेऊन पुढे एक पराक्रमी पुरुष योद्धा होशील व भीष्माच्या नाशास कारणीभूत होण्याचा वर दिला. अंबाने भीष्माच्या मृत्यूची कामना करीत स्वतःला अग्नीच्या हवाली केले. शिखंडी – पांचाल नरेश द्रुपदाला अपत्य नसल्याने त्याने शिवाची भक्ती करून अपत्य प्राप्तीचे वरदान मागितले. त्यांनी पत्नीच्या पोटी एक कन्या जन्म घेईल व ती पुढे पुरुष रूपात परिवर्तित होईल, असा वर दिला. त्याप्रमाणे दृपद राजाची पत्नी पृषतीच्या पोटी एका कन्येचा जन्म झाला. राजा-राणीने तिचे पालन मुलाप्रमाणे केले. वयात आल्यावर तिचा विवाह दशार्ण देशाचा राजा हिरण्यवर्मन यांच्या कन्येशी झाला. मात्र विवाहाच्या पहिल्याच दिवशी आपला पती पुरुष नसून स्त्री असल्याचे लक्षात येताच हिरण्य वर्मनची कन्या त्याच्याकडे परत गेली व तिने सर्व वृत्तांत कथन केला. आपली फसवणूक झाल्याचे पाहून हिरण्यवर्मनने दृपदा विरुद्ध युद्धाची तयारी केली.
आपल्यामुळे पित्यावर आलेले संकट पाहून शिखंडीला अतिशय दुःख झाले. शिखंडी रात्रीची दूर जंगलात जाऊन अश्रू ढाळू लागली. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका यक्षाची नजर तिच्यावर पडली. तिची विचारपूस केली असता यक्षाला तिची दया आली व एका विशिष्ट कालावधीसाठी त्याने आपले पौरुषत्व शिखंडीला देऊन त्याचे स्त्रीत्व घेतले. शिखंडीने घरी जाऊन आपल्या पित्याला सर्व वृत्तांत कथन केले. ध्रुपदने हिरण्यवर्मनला आपला मुलगा पुरुषच आहे, शंका असल्यास शंका-समाधान करण्यासाठी दूत पाठवावे असा निरोप दिला. हिरण्यवर्मनने दूत पाठवून शंकेचे निराकरण केले व खात्री झाल्यानंतर मुलीला परत सासरी पाठवले. त्या दोघांमधील वितुष्ठ टळले. मात्र स्त्री वेशामुळे यक्ष कुबेराला भेटावयास जाऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीचे कारण कुबेराला कळताच कुबेराने त्याला तू आता शिखंडीच्या मृत्यूपर्यंत स्त्री वेशातच राहशील असा श्राप दिला. दिलेल्या मुदतीनंतर शिखंडी परत यक्षाला त्याचे पुरुषत्व देण्यासाठी आला असता यक्षाने घडलेली घटना सांगून त्याला परत पाठविले. महाभारताच्या युद्धात पितामह भीष्माच्या पराक्रमामुळे सर्व पांडव हतबल झाले. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनास भीष्माकडे सल्ल्यासाठी नेले असता भीष्मालाच त्यांच्या पराभवाचा मार्ग विचारला. तेव्हा शिखंडीला समोर करून आपल्यावर बाण चालविल्यास आपण शिखंडी हा प्रथम स्त्री असल्याने आपण त्यांच्यावर शस्त्र चालविणार नाही असे सांगितले. यावरून बोध घेऊन कृष्णाने दुसऱ्या दिवशी अर्जुनाच्या रथावर शिखंडीला पुढे करून त्याच्या मागून अर्जुनाने पितामह भिष्मावर शरसंधान केले. मात्र समोर शिखंडी असल्याने पितामह भीष्म बाणाचे प्रतिउत्तर न देता शांत राहिले. अशा प्रकारे अर्जुनाने भीष्मावर बाणांचा वर्षाव करून त्यांना शरपंजरी निजविले. अशाप्रकारे पूर्वजन्मीच्या अंबेने शिखंडीच्या माध्यमातून आपला प्रतिशोध पूर्ण केला.