मुंबई: ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याचा पहिला भाग नुकताच पार पडला. या सोहळ्यादरम्यान वाहिनीकडून ‘लक्ष्मी निवास’ या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. अनेक दिवसांपासून या मालिकेत मुख्य भूमिकेत कोण असेल याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरांत अक्षयाला ‘पाठकबाई’ म्हणून ओळख मिळाली. हीच अक्षया झी मराठी च्या नव्या को-या मालिकेतून चाहत्यांना भेटण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे .
काय आहे मालिकेची माहिती ?
आयुष्यभर आपल्या मुलांच्या इच्छेसाठी झटणाऱ्या एका वयोवृद्ध जोडप्याच्या आयुष्यावर ही गोष्ट आहे. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेते तुषार दळवी हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास या भूमिका हे दोघंही साकारणार आहेत.लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या मुलीच्या भूमिकेत अक्षया देवधर दिसणार आहे. श्रीनिवास हे एका कार कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत असतात, तर लक्ष्मी गृहिणी असतात. आपल्या मुलींचं थाटामाटात लग्न व्हावं आणि आपण हक्काचं घर बांधावं असं यांचं स्वप्न असतं. या स्वप्नादरम्यानचा प्रवास ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याला या तिघांनी उपस्थिती लावत या मालिकेविषयीची माहिती प्रेक्षकांना दिली होती.