डॉ. विजया वाड
दिवाळी सण मोठा! नाही आनंदा तोटा’ असे म्हणत तिघी बहिणींनी एकमेकींना प्रेमाने मिठी मारली. रेणू, वेणू नि शाणू. रेणू हुशार होती, वेणू सुंदर होती, शाणू शहाणी होती. शारदा हे शाणूचे मूळ नाव. पण तिची शाणू हीच ख्याती होती. त्यांच्या राजेंद्र बर्वे हा शेजारी, त्यावर रेणूचा उजवा नि वेणूचा डावा डोळा होता. दोघींना राजू मनापासून आवडे. शाणूला पण तो खूप म्हणजे खूपच आवडे. रेणू, वेणूच्या तुलनेत आपण कमी आहोत असे तिला वाटे. म्हणून ती दूर दूर राही राजूपासून.एकदा राजूचा हॅप्पी हॅप्पी वाढदिवस होता. बिचारी शाणू! तिच्याजवळ साधे १०१ रु. द्यायला नव्हते. रेणूने तर ५०१रु. दिले. ५०१ म्हणजे छोटी का रक्कम? राजू खूश झाला. बाबा आनंदी झाले. आयता जावई चालून आल्यासारखे. त्यांच्या ३-३ मुली पिवळ्या करायच्या होत्या. हळद चढवून पिवळ्या करणे सोपे का असते? पण रेणू नि वेणूची काळजी नव्हती. कारण की, त्या नोकरी करीत होत्या. मिळवीत होत्या. छनछन रुपये कमवीत होत्या. म्हणून त्यांना भाव होता घरात. शाणू मात्र घरची कामे करीत होती. राबराब राबत होती. आई तिच्या जिवावर मजा मारीत होती. ‘करतेस तर कर नि मरतेस तर मर’ हा खाक्या. जगाचा नियमच आहे ना तो? रेणूला काॅम्पिटिशन सख्ख्या बहिणीचीच होती. वेणूलाही राजू आवडे ना!
“राजूला चमचागिरी करून तू पैसे दिलेस ना गं? ५०१ रुपये देऊन विकत घेतलेस का?”
“कॉही तॉरीच कॉय गं भैणी?” रेणूने कांगावा केला.
“मी फसायची नाही. मी ५०२ देणारे!”
“म्हणजे एक्कच रुपैय्या जास्त.”
“हो एक्कच! पण एक रुपयात लॉटरीचे तीकिट येते.”
“हल्ली अडीच रुपये झालंय.” रेणूने आठवण करून दिली.
“मग मी लॉटरीचे तीकिटच देते. आणखी तीन दिवस बाकी आहेत. निक्कालाला.”
“कर कर. ट्राय युवर कार्ड.” रेणू म्हणाली. नाक फुगवून.
मग ५०२ रुपये वेणूने सुद्धा दिले. राजू खुश्मे खूश झाला. त्याला दोघी बहिणी आवडत होत्या. ही का ती? त्याच्या मनाचा निश्चय होत नव्हता. बाबा तर काय? दोघींना द्यायला तयार होते. बहिणी-बहिणी, सवती-सवती एकमेकींवरती करती प्रीती. एक विवाहाने प्रीतीची दुसरी प्रेमाने जवळची. लिव्हिंग रिलेशन. १५ दिवस वाटून वाटून घ्या. हाय काय! अन् नाय काय? बाबांची कशालाच आडकाठी नव्हती. ‘लाविता हळद तुला, मी झालो मोकळा’ हा खाक्या होता.
“आई, मला रेणू नि वेणू दोघी आवडतात गं!”
“हो का?”
“मला दोघींशी लग्न करावेसे वाटते.”
“साहजिकच आहे.”
“मला, तर बागेतल्या येणाऱ्या, फिरणाऱ्या, हाय हॅल्लो करणाऱ्या प्रत्येक मुलीशी लग्न करावे वाटे तरुणपणी. मनाचा गोंधळ उडे. ही का ती!” बाबा म्हणाले.
“पण तो तुमच्या मनातला गोंधळ तुमच्या तीर्थरुपांनी संपवला.” आई म्हणाली.
“तीस वर्षांपूर्वी मला हिंमत नव्हती गं.”
“कसली हिंम्मत?”
“प्रेमलग्न करण्याची.”
“वैट काय झालं? तीस वर्षं तुमच्या पोळ्या लाटतेय मी. पाच पाच खाता! सकाळी पाच! रात्री पाच. वर्षाचे ३६५ दिवस म्हणजे ३६५० पोळ्या एका वर्षात.” आईने हिशेब मांडला.
“काय बाई आहेस गं तू? खाल्ल्या अन्नाचा हिशेब मांडतेस?”
बाबा रागावले.“३६५० ला ३० ने गुणा.” आई व्यवहारी झाली.
“गुणाकार नंतर करा.” रेणू व्यवहारीपणे म्हणाली.
“अरे हो. तुम्ही आता लग्नवयाच्या झाल्यात.” बाबा जागे झाले.
इकडे शाणूने छानसा प्रसादाचा शिरा केला नि राजेंद्रला घरी नेऊन दिला. राजूची आई खूशमे खूश झाली. किती स्वादिष्ट झाला होता शिरा. “दोन वाट्या दे आणखी.” ती शाणूला म्हणाली. शाणूने तसे केले. मग ती डबल टिबल खूश झाली.
“मला सिनेमाला घेऊन जा राजू.” रेणूने हट्ट केला.
“मला प्रशांत दामलेचं नाटक दाखव.” वेणूनही हेका धरला.
बापरे! सिनेमा नि नाटक? खर्चावर खर्च. मध्यंतरात चरंती. राजू चिंतेत होता. खिशात पैसे नव्हते. तशात शिरा आला.
“राजू, त्या रिकाम्या पिशव्या फेकून दे.” आई बोलली.
“आणि काय करू?” राजूने प्रश्न केला.
“सुनबाई म्हणून मला शाणू पसंत आहे.” आई म्हणाली.
राजूला ते एकदम पटले. “पसंत आहे मुलगी शाणू.” तो उत्तरला. आणि ते शुभमंगल झाले दोस्तांनो.