Wednesday, December 4, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपरतीचा पाऊस...

परतीचा पाऊस…

राजश्री वटे

जाता जाता पावसाने पुन्हा एकदा वळून पाहिले…जसे डोळ्यांतून त्याच्या अश्रू वाहत होते…धरणी मातेचा पदर भिजवून आकाशाकडे परत निघाला आहे…हिरवीगार झालेली झाडे बघून तो आनंदात होता की… जायचं आहे त्याचं दुःख होतं…
वाटलं… ते पावसाचे थेंब काही सांगू पाहत आहे जणू… एकवार गळाभेट करून बघू या… आत साचलेला पाऊस आपोआप बाहेर येईल…मनावरचे ओझे उतरून जाईल… मन तरंग तरंग होऊन जाईल…कोणाला कळणार ही नाही पाणी डोळ्यांतून वाहतं आहे की पावसाच्या डोळ्यांतून!! डोळ्यांतील अश्रू केव्हाही झरतात… नकळत…ना हम जाने…ना तुम!! का कोणास ठाऊक…कधी कधी मन आतून खूप भरले आहे आभाळासारखे… डोळे पाणावलेले भासतात… असे वाटते केव्हा बरसतील अवेळी पावसासारखे… काही कारण लागत नाही वहायला…फक्त… दुःखातच नव्हे… थोडसे सुख जवळ आले तरी डोळ्यांचे पाझरणे नाही थांबवू शकत… कसे सांगावे… कुठेही… काही कारण नसताना… हे बेबंद होऊन जातात… काळे ढग जमून येतात तेेव्हा मनाची चलबिचल होऊन डोळ्यांतला पाऊस बरसायला लागतो… कुठलं कुठलं काहीसं आठवायला लागतं! सूर्याचे उगवते रूप असो… मावळती संध्याकाळ असो… काहीसे जुने आठवते व नकळत श्वास ओलसर होत जातो… एकटे असताना देखील कधी… रात्रीच्या वेळी आकाशाकडे नजर गेलीच तर… तारकांची सजलेली मैफल नजरेस पडते… बस, ये जश्न जो देखा तो… हळव्या मनाचे व्यक्त होणे डोळ्यांतून तरंगणाऱ्या पाण्यातून दिसते… कधी समजतच नाही… या मनाला कसे आवरावे!!

सागरकिनारी लाटांसमवेत गुजगोष्टी कराव्यात तेव्हा मनात आपोआप गुणगुणायला लागते एक चिंब भिजलेली गझल!
मनाला भिजायला काहीही कारण लागतं… कोणाच्या प्रेमळ बोलण्याने… कुणाचे दुःख ऐकल्याने… एखादे गम भरे गीत ऐकल्याने सुद्धा… गळा भरून येतो… भक्तिरसातले गीत देखील निमित्त ठरते मनाच्या पावसाला! अगदी तिरंगा पाहाताच देखील गळा दाटून येतो…सगळे आठवून डोळे भरून येतात… शब्द दाटतात… हरवून जातात… कोणास ठाऊक कां… कित्येकदा अश्रूंना सांगून बघितले… वाहण्या आधी माझी परवानगी घ्यायला विसरत जाऊ नकोस… मला एकट्याला भेटत जा… पण नाही… ऐकेल ते अश्रू कसले… बरसतात… वाहतात… डोळ्यांमधल्या खोल डोहात खळबळ माजवून जातात…कोणी आसू पुसेल म्हणून वाट पाहतात…पुसणारे कोणी असेल तर वाहण्यास अर्थ आहे… नाहीतर ते वाहणे सुद्धा व्यर्थ आहे! असे हे आतल्या व बाहेरच्या पावसाचे अतूट नाते… थांबता थांबता पुन्हा वाहते!! हा परतीचा पाऊस केव्हा बरसेल… कोणास ठाऊक?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -