Saturday, May 10, 2025

किलबिलसाप्ताहिक

नवलनगरी

नवलनगरी

आकाशाचा कागद
केवढा निळा-निळा
कधी दिसे पांढरा
कधी काळा-सावळा


तेजस्वी सूर्याची त्याला
रोजच साथ
अंधारावर करी मग
दिमाखात मात


ढगांचा ताफाही तिथे
फिरतो जोशात
गडगडाट करतो कधी
कधी फार शांत


रात्रीच्या चंद्राचा
पाहावा थाट
चांदण्यांशी खेळतो
जणू सारीपाट


चांदण्या हसून
लुकलुक करती
आकाशाचे कुतूहल
उरी वाढवती


कोरडे आकाश जेव्हा
आभाळ होते
पावसाचे गाणे मला
देऊन जाते


आकाश वाटते मला
एक नवल नगरी
या नगरीची सैर
एकदा करूया तरी!



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) योग्य टेकू मिळाल्यास
पृथ्वीसुद्धा ही
तरफेच्या साहाय्याने
उचलून दाखवेन मी


ठामपणे असं म्हणणारा
कोण हा शास्त्रज्ञ ?
गणित विषयात जो
फारच होता तज्ज्ञ.


२) छंद हा सुरुवातीला
पक्षी पाहण्याचा
पाहता पाहता छंद जडला
पक्षी पाळण्याचा


पक्षी निरीक्षणाला दिली
अभ्यासाची जोड
कोण हे पक्षीतज्ज्ञ त्यांचे
कार्य फार अजोड ?


३) संसार, शेती जीवनावर
बोलते त्यांची कविता
साध्या सोप्या ओळींतील
आशय किती मोठा


‘नदी वाऱ्यानं हाललं
त्याले पान म्हनू नही’
अहिराणी बोलीतूनी हे
कोण सांगून जाई?

Comments
Add Comment