Thursday, December 12, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलमधली सुट्टी...

मधली सुट्टी…

रमेश तांबे

शाळेची मधली सुट्टी झाली होती. मुलांचा प्रचंड गोंगाट सुरू होता. वर्गात एकत्र बसून डबा खाण्यात काही मुले रमली होती. काहींचा डबा संपून मैदानात खेळ सुरू झाला होता. कुणी आवडीचे पदार्थ घेण्यासाठी दुकानात गेले होते. काही घोळक्याने शाळेच्या गॅलरीत गप्पा मारीत उभे होते. सगळीकडे नुसता कलकलाट सुरू होता. एवढा वेळ शांत असलेली शाळा आता कशी चैतन्याने फुललेली दिसत होती. अशा वेळी अजय मात्र वर्गात एकटाच बसला होता. बेंचवरच्या पुस्तकात डोके खुपसून! त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मुलांची गंमत बघत गॅलरीतून फिरत होत्या. तेव्हा त्यांना एका वर्गात अजय एकटाच बसलेला दिसला. त्यांना आश्चर्य वाटले. त्या हळूच वर्गात शिरल्या आणि अजयच्या मागे जाऊन उभ्या राहिल्या. अजय वाचनात दंगा होता. बाईंनी अजयच्या डोक्यावर हळूच हात ठेवला. तेव्हा त्याने मागे वळून पाहिले, तर मुख्याध्यापिका सदावर्ते बाई! तो चटकन उभा राहिला. बाई म्हणाल्या, “अजय सगळी मुले खाण्या-खेळण्यात, मजा करण्यात दंग असताना तू एकटाच वर्गात का बसलायस? मधल्या सुट्टीत डबा खायचा सोडून कसला अभ्यास करतो आहेस!” आता मात्र अजयने पुस्तक बंद केले आणि मॅडमकडे बघत म्हणाला, “बाई नाही आणला डबा. बाबांना आज कामाला लवकर जायचे होते. मग त्यांनी नाही बनवला डबा. अजयचे ते शब्द सदावर्ते बाईंच्या हृदयात कालवाकालव करून गेले. बाई काही बोलण्याआधीच अजय म्हणाला, “बाई आम्ही दोघेच असतो घरी. माझी आई देवाघरी गेलीय. माझे बाबाच सकाळ-संध्याकाळ जेवण बनवतात. खरंच बाई माझे बाबा खूप छान जेवण बनवतात. पण आज त्यांना वेळच मिळाला नाही.”

अजयच्या त्या शब्दांनी सदावर्ते बाई अधिकच हळव्या झाल्या. ते आईविना लेकरू बघून त्यांचे डोळे भरून आले. पाचवीत शिकणारा अजय, त्याचे ते आईविना राहणे, आपल्या बाबांविषयी त्याच्या मनात असणारा आदर-प्रेम, इतक्या लहान वयातील त्याची समज बघून बाई अचंबित झाल्या. त्या अजयच्या समोर बेंचवर बसल्या. त्याचा हात हातात घेत त्या म्हणाल्या, “हे बघ अजय तुझे बाबा रोज सकाळी कामाला जातात. त्यांना खूप घाई असते. अशा वेळी त्यांना अनेकदा तुझ्यासाठी डबा बनवता येत नाही. आता उद्यापासून तुझा डबा मी आणत जाईन. तू बाबांना त्रास देऊ नकोस.” बाईंचे ते बोलणे ऐकून अजयच्या डोळ्यांतून टपटप अश्रू खाली पडू लागले. त्यातले दोन थेंब बाईंच्या हातावर पडले आणि बाईंचे अंग शहारले. त्याला कुशीत घेत त्या म्हणाल्या, “अजय खरच काळजी करू नकोस. आता तुझ्या डब्याची जबाबदारी माझी. तुला काही हवं असल्यास मला सांगत जा.” असे म्हणून बाई हसल्या. तसा अजयचा चेहरादेखील खुलला. मग बाईंनी त्याला स्वतःचा डबा आणून दिला आणि त्यातला पहिला घास स्वतःच्या हाताने अजयला भरवला. हे करताना सदावर्ते बाईंना खूप वर्षांपूर्वी देवाघरी घरी गेलेल्या आपल्या लाडक्या चिन्मयची आठवण झाली आणि त्यांचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरून गेले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -