हास्य

प्रा. प्रतिभा सराफ 


छोटे थे तो लढते थे,
“माँ मेरी है, माँ मेरी है!”
बडे हुए तो लढते है,
“माँ तेरी है, माँ तेरी है!”


अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगातून आपण सर्व हे अनुभवलेले आहे; परंतु जेव्हा मोजून बावीस शब्दात अशा तऱ्हेने एखाद्या कवितेतून आपल्याला संदेश मिळतो तेव्हा आपण हादरून जातो. ही कविता कोणाची आहे हे शोध घेऊन सुद्धा मला कळू शकले नाही. ‘आई’ या व्यक्तीबद्दल अगदी संत साहित्यापासून ते अगदी अलीकडच्या कवीपर्यंत आपण वाचत आलेलो आहोत. कथा- कादंबरी- ललित गद्यातून आपण सर्वच आई अनुभवतो. ‘आई’ या विषयावरील कवितेला प्रचंड दाद मिळते. पुरस्कार मिळतात. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात ‘आई’ या विषयावरच्या पोस्ट आपल्याला फेसबुकवर पाहायला मिळतात. काही पोस्टमध्ये आईसोबत तिची मुले फार हालाखीच्या परिस्थितीत जगत आहेत, असे दाखवले जाते. तिच्यावर अन्याय- अत्याचार होताना दाखवले जातात. कधी-कधी अशा पोस्ट मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात किंवा त्याच्यावर लाईक- कमेंट- शेअर केल्या जातात म्हणूनही टाकल्या जातात. एकीकडे सोशल मीडियातून ‘आई’ विषयीची कणव दाखवली जाते, तर दुसरीकडे मात्र वास्तव खूप वेगळे आहे. आईच नाही, तर वडील, भावंडे किंवा नातेवाईक जे वृद्ध आहेत, स्मृतिभ्रंश किंवा अर्धांगवायू यासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त किंवा अपंग आहेत त्यांना कुटुंबीयांकडून नाकारले जाते. एखाद्या कुत्र्याला गाडीत घालून दूर कुठेतरी सोडावे त्याप्रमाणे त्यांना नेऊन सोडले जाते. त्यांनी घर सोडून जावे अशा तऱ्हेने त्यांना छळले जाते. आत्महत्या करण्यासाठीही प्रवृत्त केले जाते. ‘वृद्धाश्रम’ हा बऱ्यापैकी चांगल्या परिस्थितीतील माणसांनी निवडलेला पर्याय आहे. अलीकडे चांगली पेन्शन मिळणारे किंवा मोठ्या मिळकतीचे धनी असलेले वृद्ध, स्वतःच्या कमाईतून वृद्धाश्रमाचा खर्च उचलत मानाने स्वतःच वृद्धाश्रमाकडे वळतात.
तर आपण परत ‘आई’ या मुद्द्याकडे वळूया. अत्यंत सोशिक, आपल्या अपत्यांना स्वतःचे सर्वस्व अर्पण करणाऱ्या ‘आई’ विषयी किती जणांना आदरभाव असतो? नुसता आदरभाव असूनही चालत नाही आपण नेमके किती आणि काय आईसाठी करतो, हेही महत्त्वाचे आहे.


वृद्धाश्रमाची माहिती घेताना मला फार वाईट वाटले की, भारतासारख्या ठिकाणी हजारोंनी वृद्धाश्रम आहेत. ज्या वृद्धांना कोणी नातेवाईक नाहीत त्यांचे आपण समजू शकतो की, त्यांना अशा वृद्धाश्रमांची गरजच आहे; परंतु ज्यांच्याकडे पैसे आहेत, मनुष्यबळ आहे, मोठी घरे आहेत अशांचे काय? किती शारीरिक - मानसिक वेदना त्यांना सहन कराव्या लागत असतील, याचा विचारच आपण करू शकणार नाही. अलीकडेच ‘व्यक्त व्हा’ या संघटनेच्या अध्यक्ष ‘नेहा भगत’ या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीशी बराच वेळ बोलणे झाले. या बोलण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे पुढील काही काळासाठी आम्ही काही वृद्धाश्रमांना भेट देण्याचे ठरवले आहे. या कामासाठी पैशांची गरज तर अजिबात नाही. फक्त आपला मौल्यवान वेळ देण्याची गरज आहे. त्यांच्यापुढे कवितांचे-गाण्यांचे-नाचाचे कार्यक्रम केले नाहीत तरी चालतील; परंतु त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा केल्या तरीसुद्धा त्यांना खूप जास्त आनंद मिळू शकेल, या विचाराने आम्ही प्रेरित झालेलो आहोत.


वाढू लागलीत वृद्धाश्रमे इकडेतिकडे
नव्या पिढीवर संस्कार केले पाहिजे!


असा काहीसा गझलकार ए. के. शेख सरांचा एक आठवणीतला शेर आहे, तर आपल्या नवीन पिढीवर संस्कार करण्यासाठी आपल्यालाच पावले उचलावी लागतील. ‘आधी केले मग सांगितले’ या समर्थ रामदास यांच्या उक्तीप्रमाणे नवीन पिढीसुद्धा आपल्या पावलांवर पाऊल ठेवून वाटचाल करेल याचा विचार आपणच केला पाहिजे. मुले अनुकरणशील असतात, असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्याला नेमके काय करायचे आहे हे आपण व्यवस्थित ठरविण्याची गरज आहे. ‘आई’ कोणाचीही असो फक्त ‘आई...’ म्हणून आवाज दिल्यावर प्रत्येक आई आपल्याकडे वळून पाहते. त्यामुळे ‘मदर्स डे’ हा एक दिवसाचा सोहळा नाही. ज्या दिवशी आपण आईबरोबर सेल्फी काढतो, तर आयुष्यभर, आपल्या प्रत्येक कुटुंबातील फोटोचा ती भाग झाली पाहिजे! फोटोतील तिचे हास्य हे हृदयापासून जेव्हा उमटेल तेव्हा कुटुंबातील प्रत्येकाला तिचा खूप सारा आशीर्वाद मिळू शकेल!


pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment

साबणाचे फुगे कसे निर्माण होतात?

कथा : प्रा. देवबा पाटील त्या दिवशी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर सीता व नीता या दोन्हीही बहिणी खूपच उत्साहाने घरी

कावळा निघाला शाळेला...

कथा : रमेश तांबे एक होता कावळा. त्याला एकदा वाटलं आपणही शाळेत जावं. माणसांची मुलं शाळेत जातात. तिथं जाऊन मुलं काय

ट्रोल

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ साधारण दहा वर्षं मागे पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की ‘ट्रोल’ हा शब्द मी अलीकडे

निंदा वाईटच

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मनुष्य सामाजिक प्राणी आहे. समाजात राहण्यासाठी परस्परांचा आदर, समजूत,

चिमणीची गोष्ट...

एक होती चिमणी ती एका झाडावर राहायची. तिचा शेजारी होता कावळा. तो होता थोडासा बावळा. काव काव करायचा अन् चिमणीला

समुद्राचे पाणी निळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील रोजच्यासारखे सीता व नीता या दोघी बहिणींनी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर आपला गृहपाठ