मुंबई: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पुणे येथील कसोटी सामन्यात ११३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडीही घेतली आहे. किवी संघाने पहिल्यांदा भारतात कसोटी मालिका जिंकली आहे.
तर दुसरीकडे भारतीय संघाने तब्बल १२ वर्षांनी मायभूमीत कसोटी मालिका गमावली आहे. याआधी भारतीय संघाला डिसेंबर २०१२मध्ये इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ असे पराभवास सामोरे जावे लागले होते.
सामना संपल्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत भाग घेतला. दरम्यान, रोहितने यादरम्यान असे काही म्हटले की यावरून चांगलाच गोंधळ झाला. रोहितने म्हटले की १२ वर्षात एकदा असा परफॉर्मन्स तर होऊ शकतो.
रोहित शर्मा म्हणाला, आम्ही केवळ २ सामने गमावले आहेत. आम्ही भारतात अनेक सामने जिंकलेत. येथे फलंदाजांनी खराब पिचवरही जबरदस्त कामगिरी केली आहे. तुम्ही त्यावर का लक्ष देत नाही. हे पहिल्यांदा घडले की आमची फलंदाजी कोसळली. १२ वर्षात इतकं तर अलाऊड आहे यार.
रोहित पुढे म्हणाला, जर आम्ही १२ वर्षांपासून कोलमडत आहोत तर आम्ही काहीच जिंकलो नसतो. भारतात आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत की आम्हाला प्रत्येक गोष्ट जिंकावीच लागेल. आपण ही सवय बनवली आहे. ही तुमची चूक नाही तर आम्ही स्वत:साठीचे हाय स्टँडर्ड सेट केलेले आहेत.
आम्ही घरच्या मैदानावर सलग १८ मालिका जिंकल्या आहेत. याचा अर्थ आम्ही बऱ्याच गोष्टी चांगल्या केल्या आहेत. आम्ही गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. मला वाटते की २-३ डावांत आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. मात्र असे तेव्हाच होते जेव्हा तुम्ही दीर्घकाळ सातत्याने चांगली कामगिरी करत असता.