मुंबई: मुंबईच्या वांद्रे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने हा निर्णय तात्काळ लागू केला आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवाळी तसेच छट पुजेदरम्यान मूव्हमेंट सुरळीतपणे व्हावी यासाठी मुंबईच्या मुख्य रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीसाठी तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीसाठी तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
*सणासुदीच्या काळात गर्दी नियंत्रणासाठी सूचना*
दिवाळी आणि छट पूजेदरम्यान प्रवाशांची मुव्हमेंट सुरळीतपणे सुनिश्चित करण्यासाठी, प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती प्रतिबंधित करण्यात आली आहे:
🔷 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
🔷दादर
🔷 लोकमान्य टिळक टर्मिनस…— Central Railway (@Central_Railway) October 27, 2024
दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले हे निर्बंध तात्काळ लागू केले जातील. तसेच हे निर्बंध ८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत लागू असतील. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय दृष्ट्या आजारी प्रवाशांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
वांद्रे रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. यादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. यात ९ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.