पंढरपूर : वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) १२ नोव्हेंबर रोजी आहे. दरवर्षी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता (Code Of Conduct) लागू असल्यामुळे महापूजा कोणाच्या हस्ते करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे अभिप्राय मागवला असून, त्यांच्या आदेशानुसार नियोजन करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने अनेक निर्बंध आले आहेत. याचा फटका कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला बसण्याची शक्यता आहे. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा अलिखित नियम आहे. मात्र निवडणुकीमुळे कोणाला महापूजेला बोलवायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत विधी व न्याय विभागाकडे अभिप्राय मागितला असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. या आधी अशी परिस्थिती आल्यावर निवडणूक आयोगाच्या परवानगीने महापूजा करण्याची परवानगी दिली होती. कोणतेही राजकीय भाष्य, मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही वक्तव्य करु नये, असे काही नियम व अट घालून परवानगी दिली होती.
त्यामुळे आता राज्यातील दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोण महापूजेला येणार आणि निवडणूक आयोगाची परवानगी घेणार हे पाहावे लागणार आहे. वास्तविक महापूजा आणि त्यानंतर सत्कार समारंभ यात जवळपास दोन ते अडीच तास वेळ जातो. या काळात दर्शन रांग थांबविली जाते. मात्र, यंदा आचारसंहिता असल्याने महापूजा होईल आणि लगेच दर्शन सुरू होईल असे नियोजन आहे. असे असले तरी सावळ्या विठुरायाच्या पूजेचा मान कोणाला मिळणार, हे पाहावे लागेल.