Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीशिंदे आणि उबाठा गटात बंडखोरी होण्याची शक्यता

शिंदे आणि उबाठा गटात बंडखोरी होण्याची शक्यता

दीपक मोहिते

बोईसर विधानसभा मतदारसंघ हा दोन्ही शिवसेनेला डोकेदुखी ठरला आहे.ही जागा महाविकास आघाडीने शिवसेना ( उबाठा ) गटाला तर महायुतीने एकनाथ शिंदे गटासाठी सोडली आहे.उबाठा गटाकडून डॉ.विश्वास वळवी याना तर शिंदे गटाने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी जगदीश धोडी यांचे नाव आघाडीवर आहे.अशावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कमलाकर दळवी व भाजपचे माजी आ.विलास तरे यांनी एन्ट्री केल्यामुळे दोन्ही गटात खळबळ उडाली आहे.
विलास तरे सध्या भाजपमध्ये असून ते तिकिटांच्या शर्यतीमध्ये सुरुवातीपासून होते व आजही आहेत.पण हा मतदारसंघ जागावाटपात शिंदे गटाकडे गेल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे.त्यामुळे तरे आता भाजपचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

दुसरीकडे उबाठा गटातर्फे येथे डॉ.विश्वास वळवी यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर पालघर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कमलाकर दळवी हे नाराज झाले असून बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अविभक्त शिवसेनेचे उमेदवार असलेले कमलाकर दळवी यांनी त्या निवडणुकीत सुमारे ५६ हजार मते मिळवली होती.पराभूत झाल्यानंतरही पक्ष संघटनेत कार्यरत राहून ग्रामीण भागात पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले होते. शिवसेना पक्षफुटी दरम्यान अनेक मातब्बर नेते शिंदे गटात सामील होत असताना,त्यांनी ठाकरे गटात राहून आपले काम सुरु ठेवले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदार संघाच्या ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती.

विधानसभा निवडणुक जाहीर होण्याच्या तोंडावर पक्षात प्रवेश केलेले डॉ. विश्वास वळवी हे बोईसर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाल्यामुळे उबाठा गटातील अनेक जण नाराज झाले आहेत.निष्ठावंतांना डावलून जिल्ह्याबाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास आम्ही बंडखोरी करू,असा इशारा नाराज पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. गुरूवारी दुपारी स्थानिक आणि निष्ठावंताला उमेदवारी देण्यात यावी,या मागणीसाठी बोईसर विधानसभा क्षेत्रातील उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मासवण गावात एकत्र आले होते. यावेळी स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रमुखांकडे केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -