‘संत्रानगरी नागपूरमध्ये दिमाखदार दुसरे विदर्भ’ लेखिका साहित्य संमेलन

  53

मेघना साने


लेखिका मैत्रिणींनो समाजात वावरताना डोळे कायम उघडे ठेवा... कुठे काय चाललय... ते बघा. स्त्रियांचे प्रश्न आपल्या लिखाणातून मांडा... आपल्यासाठी कोणीतरी काही करेल... या भ्रमात राहून नका... म्हणून मला असं वाटतं की 'तुझी तूच शोध दिशा... इतरांच्या कुबड्यांची गरज तुला नाही'... हे सांगण्यासाठीच...स्त्री सुरक्षा, समस्या व उपाय या विषयाचा उहापोह व्हावा या दृष्टिकोनातून आहे 'मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान' आणि 'सेवादल शिक्षण संस्था' यांच्या वतीने आयोजित केल्या गेलेले दुसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन मला विशेष महत्त्वाचे वाटते. "असे उद्गार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष सुप्रसिद्ध कादंबरीकार विजयाताई ब्राह्मणकर यांनी काढले. यावेळी मंचावर उद्घाटक डॉ. मनीषा यमसनवार, प्रमुख अतिथी हेमांगीताई नेरकर, स्वागताध्यक्ष वृंदाताई संजय शेंडे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निरुपमा ढोबळे, सेवादल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. सुशील मेश्राम आणि या साहित्य संमेलनाची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळून असलेल्या 'मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान'च्या अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर उपस्थित होत्या.


'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले परिसर' असे नाव देण्यात आलेल्या संमेलनाच्या या परिसरात विदर्भातील अकराही जिल्ह्यांमधून उपस्थित झालेल्या लेखिकांची मांदियाळी भरली होती. ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. "हे केवळ साहित्य संमेलन न राहता एक चळवळ झालेली आहे." असे मुख्य आयोजक विजया मारोतकर यांनी प्रास्ताविकातून प्रस्तुत केले. त्या म्हणाल्या "विदर्भाच्या अकराही जिल्ह्यांमध्ये तळागाळातील लिहित्या लेखिकांना बाहेर आणण्याचा आमचा मानस आहे. तिचं जगणं जगापुढे याव, याकरता अशा साहित्य संमेलनाची गरज आहे. यामुळे तिच्यात एक आत्मिक बळ येते आणि त्या सकारात्मक ऊर्जा तिच्या जगण्याला पुढे नेतात." कविवर्य आरती प्रभू यांच्या कन्या हेमांगी ताई नेरकर या प्रमुख पाहुण्या यांनी 'विदर्भाच्या मातीने मुंबईला साद घातली आणि हा दरवळ तिथपर्यंत आणला' याबद्दल आभार मानले. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील आदरणीय ज्येष्ठ कवयित्री मिराबाई ठाकरे यांना आधुनिक बहिणाबाई, तर गोंदिया जिल्ह्यातील ज्येष्ठ कवयित्री अंजनाबाई खुणे यांना झाडीपट्टीची बहिणाबाई म्हटले जाते. डॉ. जयश्रीताई पेंढारकर, जयश्रीताई रुईकर, अंजनाबाई खुणे आणि धनश्री लेकुरवाळे यांना ‘विदर्भ स्त्री रत्न’ पुरस्काराने पुरस्कृत केले गेले, तर साहित्य संमेलनाला समर्पित "विदर्भ शलाका" या विशेषांकासह पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले. विदर्भातील लेखिकांच्या साहित्याबद्दल मला कुतूहल होते. म्हणून या संमेलनाला एक श्रोता म्हणून मी उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात "वैदर्भीय लेखिकांचे वैशिष्ट्यपूर्ण लेखन" हा परिसंवादाचा विषय होता. डॉ. भारती खापेकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या सत्राला डॉ. मंदा नांदूरकर, अमरावती या प्रमुख अतिथी होत्या. या सत्रामध्ये पद्मिनी घोसेकर यांनी आहारशास्त्राचे लेखन करणारे लेखिका डॉ. जयश्री पेंढारकर, डॉ. सीमा अतुल पांडे, डॉ. विद्या ठवकर यासारख्या लेखिकांच्या लेखनाची दखल घेतली. डॉ. वैशाली कोटंबे, अकोला यांनी बोलीभाषेचे वैशिष्ट्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखिका उषा किरण अत्राम, अंजनाबाई खुणे यांचा उल्लेख केला. उज्ज्वला पाटील यांनी सामाजिक परिवर्तनाचे भान ठेवत लेखन करणाऱ्या लेखिका, संमेलनाच्या अध्यक्ष, अशा विजयाताई ब्राह्मणकर यांचा उल्लेख केला, तर समाजात परिवर्तन घडवण्याकरता 'पोरी जरा जपून'चा ध्वज घेऊन धावणाऱ्या प्रा. विजया मारोतकर यांच्या साहित्यिक वाटचालीचा परामर्श घेतला. विमलताई देशमुख यांसारख्या व्यक्तिमत्त्वावर लेखन करणाऱ्या डॉ. मंदाताई नांदुरकर यांच्या लेखनाचा विशेष उल्लेख झाला.


आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या जाणीवेतून, विदर्भातील ज्येष्ठ व सुप्रसिद्ध कवयित्री आदरणीय विजयाताई मारोतकर यांनी विदर्भातील लेखिकांना एकत्रित केले. अकरा जिल्ह्याचे अकरा समूह करून दर गुरुवारी प्रत्येक समूहावर ‘सावित्रीचा वसा’हा काव्यलेखनाचा उपक्रम २१ आठवडे राबविला. या उपक्रमामुळे अनेक कवयित्री लिहित्य झाल्या. सर्वानुमते वैदर्भीय कवयित्रींचा ‘काव्यवसा’हा प्रतिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित केला. निशा डांगे यांनी विदर्भातील कवयित्रींनी निर्माण केलेल्या "काव्यवसा" चा संदर्भ घेत त्यांच्या काव्य लेखनाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केली, तर डॉ. सुनंदा जुलमे यांनी लेखनाशिवाय विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या लेखिकांच्या कार्याचा उल्लेख केला. या संमेलनाचे विशेष आकर्षण असलेले "बाई पण भारी देवा" हे कविसंमेलन अध्यक्ष विजयाताई कडू यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले. कवयित्री पल्लवी परुळेकर, मुंबई या प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होत्या. बाईच्या जगण्याचे विविध पदर उलगडत एकापेक्षा एक दमदार काव्य ३० कवयित्रींनी आपल्या कवितांमधून सादर केले. संध्याकाळी गझल मुशायरा, कवी संमेलन, कथाकथन असेही कार्यक्रम या संमेलनात होते. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात "कौतुकाची पहिली थाप" हा परिसंवादाचा विषय होता. या सत्राच्या अध्यक्ष स्मिताताई गोळे अध्यक्ष भाषण करताना म्हणाल्या की, "लेखिकांनो आपल्या सगळ्यांना कौतुक जरूर हवं असतं; परंतु आपण साहित्यिक कवयित्री आहोत याचे भान ठेवा. कथा, कविता चोरू नका. अन्यथा कौतुक होत नाही. आजकाल शीर्षकेही चोरली जातात. तेव्हा असा प्रकार करून मिळवलेले कौतुक चिरकाल टिकत नसते." अशी तंबीही दिली. दोन दिवस चाललेल्या 'दुसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलना'च्या समारोप सत्राचे अध्यक्षपद आदिवासी साहित्याच्या अभ्यासक उषाकिरण अत्राम यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की, "फार काळ महिलांनी आपले दुःख काळजात लपवून ठेवले. ते दुःख साहित्य रूपाने पुढे येत आहे. हे संमेलन त्याची दखल घेत आहे. मी आता लेखणीची मशाल हाती घेतली आहे. सख्यांनो ... तुम्हीही मशाल हाती घेऊन आकाश उजळून टाका". संमेलनाध्यक्ष विजया ब्राह्मणकर यांनी संमेलनाचा आढावा घेत विदर्भाची लेखणी बळकट करण्याचे आव्हान केले.


meghanasane@gmail.com

Comments
Add Comment

Face Cake Smash Trend: मित्रांच्या वाढदिवसानिमित्त कधीही करू नका अशी मस्करी, जाऊ शकतो जीव, पहा हा Viral Video

Face Cake Smash Trend: आजकाल वाढदिवस म्हंटला की, प्रत्येकजण खूप मोठ्या थाटामाटात साजरा करतात, लेट नाईट पार्ट्या केल्या जातात.

राजिंदर नाथ

मराठी नाटकांना हिंदीत नेणारा रंगकर्मी भालचंद्र कुबल : पाचवा वेद गेल्या आठवड्यात अखिल भारतीय नाट्यसृष्टीतील

श्रीमंत भिकाऱ्याची गोष्ट

मनभावन : आसावरी जोशी आज थोड्या वेगळ्या विषयावर बोलावेसे वाटले... बऱ्याच जणांना असे वाटेल की मी हा विषय का निवडला...?

स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा ‘विराट’

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  ‘अवकारिका’ या मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणारा व दक्षिणात्य

एक रंगमंच, दोन दीर्घांक आणि संयुक्त ‘प्रयोग’...

राजरंग : राज चिंचणकर मराठी रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. यात प्रायोगिक रंगभूमीचा वाटा मोठा आहे.

भारतीय नाट्यसृष्टीचे मूळ मोठे करणारे रतन

भालचंद्र कुबल : पाचवा वेद मध्यंतरी एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. त्यात रतन थिय्याम यांचा फोटो