आला आला म्हणता म्हणता एकांकिकांचा सिझन सुरू देखील झाला. मुंबईतील महत्त्वाच्या स्पर्धा सध्या पार पडताहेत. येत्या काही दिवसांत उरल्या सुरल्या पार पडतील. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमधल्या तरुणाईचा जल्लोष प्रत्येक स्पर्धेसाठी चैतन्य निर्माण करून देणारा ठरतोय. त्यामुळे खुल्या गटाची कळी देखील खुलतेय. या एकांकिका स्पर्धांमध्ये कायम खुला गट आणि आंतरमहाविद्यालयीन अशा दोन विभागांमध्ये विभागली गेली आहे. कारण खुल्या गटातील स्पर्धक हे वयोमानाने मोठे असल्याने शिस्त आणि शिष्टाचार पाळणारे असतात. परीक्षा केंद्रावरील अविर्भावात प्रयोग सादरीकरणाच्या गंभीर वृत्तीने प्रत्येक स्पर्धेकडे पाहत असतात. साधारणतः खुल्या गटाला विविध वयोगटाचे कलाकार उपलब्ध होऊ शकतात मात्र आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थी गटाला वयोमानाच्या सादरीकरणाला वयोमर्यादा येतात. कारण वृद्ध अथवा बाल कलाकाराची संहितेला गरज असल्यास कॉलेजमधल्या कुणा मुला/मुलीला ती व्यक्तिरेखा साकारणं भाग असतं. याउलट खुल्या गटातील एकांकिकांबद्दल म्हणता येईल. थोडक्यात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमधल्या एकांकिका खुल्या स्पर्धेच्या तुलनेत कमी पडतात; परंतु आता महाविद्यालये आणि त्यांचे दिग्दर्शक यांनी एकांकिकांचे एक “स्पर्धात्मक समीकरण” तयार केले आहे आणि आज मी त्यावरच थोडे लिहिणार आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या अनुभवाचे हे एक पान म्हटले तरी चालेल.
भालचंद्र कुबल
सर्वप्रथम आपण एकांकिका म्हणजे नेमके काय हे पाहू. एका अंकात सामावलेल्या नाट्यास आपण एकांकिका म्हणतो. स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती एककेंद्रित करणारा; थोडक्यात उत्कट, एकसंघ व एकजिनसी परिणाम साधणारा संपूर्ण, स्वयंपूर्ण, एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका. भरताने संस्कृत नाट्यशास्त्रात नाटकांचे दहा प्रकार सांगितले आहेत. त्यातले भाण, उत्सृष्टिकांक, व्यायोग आणि वीथी हे चार प्रकार एकांकिकांचे आहेत. याचा अर्थ, भरताच्या काळातही ही चार प्रकारची नाटके होत असावीत. स्थल-काल व कथानकाची एकता साधणाऱ्या, प्रभावी व्यक्तिरेखा असणाऱ्या व एकसंघ स्वरूपाच्या पाच स्वयंपूर्ण एकांकिका भास या नाटककाराने लिहिल्या आहेत. पण भासाला अनुसरून नंतरच्या नाटककारांनी अशा एकांकिका लिहून एक प्रवाही परंपरा निर्माण केल्याचे आढळत नाही. त्यानंतर, भारतामधल्या ब्रिटिश राजवटीच्या काळात मुख्यत्वे संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयावरून स्फूर्ती घेऊन मराठी एकांकिका लिहिल्या गेल्या. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात मात्र हा नाट्यप्रकार मराठीत भरभराटीला आला. आज या नाट्यप्रकाराला निदान महाराष्ट्रात तरी भरपूर मागणी आहे. त्यामुळे लोकप्रियतेच्या बाबतीत एकांकिका हा नाट्यप्रकार अव्वल स्थानावर आहे.
एकांकिका सुमारे अर्ध्या ते पाऊण तासाची असते. ती बहुरूपिणी असते. तिला कोणत्याही विषयाचे वावडे नसल्याने ती काव्यमय, चर्चात्मक, प्रहसनासारखी, तत्त्वचिंतनपर किंवा रहस्यकथेसारखी असू शकते. एखाद-दुसरीच मध्यवर्ती व्यक्तिरेखा, अर्थभारीत आणि नाट्यगर्भ असे मोजके संवाद, तीव्र व उत्कट परिणाम साधणारे प्रसंग या सर्वांच्या साह्याने एकांकिका एकात्म परिणाम साधते. आजची मराठी एकांकिका ही एकप्रवेशी न राहता बहुप्रवेशी आणि बहुकेंद्री झाली आहे. मराठीतील सुरुवातीच्या एकांकिका या इंग्रजी एकांकिकांचे अनुवाद आणि रूपांतरे असत. उदा. इंग्रजी ‘दि सीक्रेट’चा किरातांनी केलेला ‘संशयी शिपाई’ हा अनुवाद; ‘दि डिअर डिपार्टेड’ आणि ‘कमिंग थ्रू द राय’ या एकांकिकांची माधव मनोहर यांनी केलेली अनुक्रमे ‘आजोबांच्या मुली’ आणि ‘जन्मापूर्वी’ ही रूपांतरे. तसेच दिवाकरांचे ‘आंधळे'(मूळ इंग्रजी लेखक-मेटरलिंक) वगैरे, राम गणेश गडकऱ्यांचे ‘दीड पानी नाटक’ ही बहुधा अनुवादित नसलेली स्वतंत्र एकांकिका असावी. पुढील काळात अनंत काणेकर, दत्तू बांदेकर, भा. वि. वरेरकर, मो. ग. रांगणेकर, व्यंकटेश वकील, शं. बा. शास्त्री इत्यादी लेखकांच्या एकांकिकाही प्रकाशित झाल्या.
इ.स. १९५० मध्ये मुंबईतील भारतीय विद्याभवन या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एका़किका स्पर्धा घ्यावयास सुरुवात केली आणि मराठीत एकांकिका हा नाट्यप्रकार बहरास आला. मी मुद्दाम इथे २०२४ मध्ये घेतल्या जाणाऱ्या एकांकिका स्पर्धांची यादी देणार नाही कारण आजचा विषय आंतरमहाविद्यालयीन एकांकिकांचे परिवर्तन खुल्या वयोगटातील एकांकिकांमध्ये झाल्यावर त्यांचा दर्जा कमी झालेला आढळतो का? तर त्याचे उत्तर होय असेच आहे. उदाहरण म्हणून नुकतीच झालेली अमर हिंद मंडळाची एकांकिका स्पर्धा आंतरमहाविद्यालयीन आणि खुल्या गटातील स्पर्धकांचे छान मिश्रण होते. माझ्या मते महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून हाताळल्या जाणाऱ्या विषयांबद्दल नक्कीच कौतूक आहे. भन्नाट विषयांशिवाय कदाचित कॉलेजमधील तरुण मंडळी एकांकिका करतच नसावेत. शिवाय मॉबसारखे सादरीकरणाचे हत्यार फक्त महाविद्यालयीन मंडळीच वापरू शकतात. आजकाल नॅक अॅक्रेडिएशन महाविद्यालयीन श्रेणी ठरवित असल्याने सांस्कृतिक कार्यावर विशेष लक्ष पुरवले जाते, त्यासाठीचा निधी पुरवला जातो. महाविद्यालयाचे नाव कसे होईल याची जणू चढाओढच लागलेली असते आणि तेच एकांकिका स्पर्धांच्या पथ्यावर पडले आहे. खुल्या वयोगटातील स्पर्धांमध्येसुद्धा आंतरमहाविद्यालयीन एकांकिकांचे वर्चस्व वाढू लागलेय; परंतु झगमगीत एकांकिकांच्या सादरीकरणाला न भुलता अगदी सर्वात पहिला जो वयोगटाचा मुद्दा मी मांडला होता, तो निकष लावल्याने अनेक महाविद्यालयीन एकांकिका अपयशही येते. त्यामानाने खुल्या गटातील हौशी मंडळी स्वतःची पदरमोड करून, ओळखी-पाळखीतल्या लेखकाची एखादी एकांकिका हौसे खातर करून आपला नाट्यकंड शमवताना आढळतात.
मी मुद्दाम एकांकिकेची व्याख्या या लेखात नमूद केली कारण याच नाट्यप्रकाराने मराठी नाटकात वेगवेगळे इझम्स जन्माला घातले, ज्या इझम्सने प्रायोगिक रंगभूमी घडवली. स्पर्धेच्या या प्रचंड गदारोळात स्पर्धांमधून निर्माण झालेली प्रायोगिकतेची तत्त्वे सांगणाऱ्या एकांकिका मात्र आपण गमावल्या आहेत. रुईयाची संसाराणू पेंडघर, रुपारेलची जागतिक शांतता दिन साजरा, चेतनाची डिक्टेटर, ज्ञानसाधनाची अश्वत्थाची मुळे, सिडनहॅमची कर्म, जे. जे. स्कूल आर्टची चौकोनातला त्रिकोण, सिद्धार्थची प्रिय गुरुजी सारखी खरीखुरी प्रायोगिकता जपणाऱ्या एकांकिका मात्र लोपल्या आहेत. त्यांची जागा चटपटीत विषय, नेत्रदीपक सादरीकरण आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या लिखाणातील वेगाने व्यापली आहे. दुर्दैवाने त्याचेच अनुकरण मिनी स्वरूपात हौशी रंगभूमीवरील रंगकर्मी करताना आढळतात. हे असेच पुढील काही वर्षे तरी नक्की सुरू राहणार, स्पर्धात्मक नाटकच चढाओढ करत राहणार आणि नाटकातील प्रायोगिकता संपुष्टात येणार…! थोडक्यात आमची एकच पिढी अशी आहे जिच्या नशिबी प्रायोगिक नाटकाचा उदय, बहर आणि अस्त बघण्याचे दुर्भाग्य अनुभवायला लागणार आहे…!