Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडीPAK vs ENG : पाकिस्तानचा इंग्लंडवर नऊ विकेटसने दणदणीत विजय!

PAK vs ENG : पाकिस्तानचा इंग्लंडवर नऊ विकेटसने दणदणीत विजय!

मालिकेत २-१ ने विजय, मायदेशी तीन वर्षांनंतर जिंकली मालिका

नवी दिल्ली : पाकिस्तान संघाने इंग्लंडविरुद्ध (PAK vs ENG) पहिला कसोटी सामना पराभूत झाल्यानंतर मात्र अफलातून पुनरागमन करत पुढील दोन्ही सामने जिंकले आणि मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली. रावळपिंडी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानने तिसऱ्याच दिवशी ९ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान पाकिस्तानने २०२१ नंतर पहिल्यांदाच मायदेशात कसोटी मालिका जिंकली आहे. इंग्लंडला पाकिस्तानसमोर अवघे ३६ धावांचेच लक्ष्य ठेवता आले होते. हे लक्ष्य पाकिस्तानने ३.१ षटकात एक विकेट गमावत पूर्ण केले. कर्णधार शान मसूदने आक्रमक खेळत ४ चौकार आणि एक षटकारासह ६ चेंडूत नाबाद २३ धावा केल्या. तसेच सईम आयुबने ८ धावांवर विकेट गमावली, तर अब्दुल्ला शफिकने ५ धावा केल्या.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ६८.२ षटकात सर्वबाद २६७ धावा केल्या. इंग्लंडकडून जॅमी स्मिथने सर्वाधिक ८९ धावा केल्या, तर बेन डकेटने ५२ धावांची खेळी केली. त्याचबरोबर गस ऍटकिन्सनने ३९ धावांची खेळी केली. पण बाकीच्यांना खास काही करता आले नाही. पाकिस्तानकडून या डावात साजिद खानने ६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच नोमन अलीने ३ विकेट्स घेतल्या, तर झाहिद महमुदने १ विकेट घेतली. त्यानंतर पाकिस्तानकडून सौद शकिलने १३४ धावांची शतकी खेळी केली. पण नंतर फलंदाजी कोलमडली होती. परंतु नोमन अली आणि साजिद खान यांनी नंतर केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानने ९६.४ षटकात ३४४ धावा केल्या आणि ७७ धावांची आघाडी घेतली. नोमन अलीने ४५ आणि साजिदने ४८ धावांची खेळी केली.

इंग्लंडचा डाव ११२ धावांवर गडगडला

इंग्लंडकडून रेहान अहमदने ४ विकेट्स घेतल्या, तर शोएब बाशीरने ३ विकेट्स घेतल्या. गस ऍटकिन्सनने २ आणि जॅक लीचने १ विकेट घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी फक्त ११२ धावांवर उरकला. पाकिस्तानच्या फिरकीपटूंसमोर इंग्लंडचे फलंदाज फार काही करू शकले नाहीत. इंग्लंडकडून जो रुटने सर्वाधिक ३३ धावा केल्या, तर हॅरी ब्रुकने २६ धावा केल्या. या दोघांशिवाय कोणालाही २० धावाही पार करता आल्या नाहीत. पाकिस्तानकडून नोमन अलीने ६ विकेट्स घेतल्या, तर साजिद खानने ४ विकेट्स घेतल्या. दरम्यान, इंग्लंड ११२ धावांवर सर्वबाद झाल्याने त्यांना पाकिस्तानसमोर ३६ धावांचेच लक्ष्य ठेवता आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -