कणकवली : संजय राऊत काँग्रेस आणि उबाठामधील वादाबद्दल कितीही खोटे बोलत असले तरी आघाडीत बिघाडी झाली आहे हे जगजाहीर आहे. येत्या ४८ तासांमध्ये काँग्रेस पक्ष महत्वाचा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा भूकंप होणार आहे. काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे, असा गौप्यस्फोट भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केला. कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.
दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरळ सरळ नाराजीची भूमिका घेतली. मिटिंगमधून उठून ते गेले. विदर्भ कोकण आणि मुंबईतल्या काही जागांबद्दल उद्धव ठाकरे हे परस्पर पक्षाचे एबी फॉर्म वाटत आहेत. त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच पुढच्या दोन दिवसांमध्ये काँग्रेस आपली भूमिका घेईल अशा सरळ स्पष्ट राज्यांच्या नेत्यांना कळविलेला आहे, अशी आमच्याकडे माहिती आहे. म्हणून महाविकास आघाडी शेवटचे काही तासाचे राहणार आहे. महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे कोणालाही न विचारता कोणालाही न सांगता कोणालाही न विश्वासात घेता, ए बी फॉर्म वाटताहेत. ज्या जागेवर अजूनपर्यंत चर्चा फायनल झालेले नाही. उदाहरण भायखळा, हिंगोली, देवळाली हे मतदार संघ कोणत्या पक्षाला द्यायचे याचा निर्णय झालेला नाही.
असे अजून कितीतरी मतदार संघ आहेत. ही चार नावे उदाहरण म्हणून दिली. त्या जागेवर अजूनपर्यंत आघाडी म्हणून निर्णय झालेला नाही. तरीही उद्धव ठाकरेंनी त्याचे एबी फॉर्म आपल्या पक्षाच्या उमेदवारांना दिले आहेत. म्हणजे काँग्रेसला फाट्यावर मारण्याचे काम उद्धव ठाकरे सरळ स्पष्ट करतात. त्यामुळे काँग्रेसचे नेते मंडळी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल कुठल्या शब्दात खाजगीमध्ये चर्चा करत आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर निघण्याचा निर्णय ९० टक्के झालेला आहे आणि काँग्रेसचे अस्तित्व संपवायचा जो विडा उद्धव ठाकरेंनी उचलला त्याबद्दल राहुल गांधीजींना प्रचंड राग आलेला आहे. त्या पद्धतीची भूमिका लवकरच काँग्रेस घेणार आहे, अशी खात्रीलायक माहिती आहे.