Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडीमहायुती, महाआघाडी नको, आता एकला चलो रे

महायुती, महाआघाडी नको, आता एकला चलो रे

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचे सुतोवाच

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांत बहुसंख्य जागांचे वाटप झाले आहे. काही जागांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे. मात्र त्यावरही लवकरच तोडगा निघेल, अशी आशा दोन्ही आघाड्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यात अल्पसंख्याकांचा पाठींबा असलेल्या एमआयएम या पक्षाकडून महाविकास आघाडीसोबत जागावाटपाचा प्रयत्न चालू होता. मात्र आता हा पक्ष या निवडणुकीत ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेण्याची शक्यता आहे. कारण तसे सूतोवाचच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केले आहे. आता सगळे संपले आहे. आमची यादी तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आता सगळं संपले आहे. महाविकास आघाडीसोबत चर्चा केली, पत्र लिहले. पण आता आमचे जिथे विद्यमान आमदार आहेत, तिथे महाविकास आघाडीने उमेदवार दिले आहेत. आमचीदेखील यादी तयार आहे. काँग्रेसचे नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासोबत चर्चा झाली होती. युती असल्याने आम्ही चर्चा करू असे ते म्हणाले होते, अशी माहिती जलील यांनी दिली.

तसेच चर्चेचा काही फायदा झाला नाही. मला सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता. शिवसेनेच्या नेत्यांसोबत बोललो होतो. शिवसेनेच्या ज्या नेत्याशी चर्चा झाली, त्याचं नाव जाहीर करणार नाही. शिवसेनेकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. नाना पटोले यांच्यासोबत चर्चा झाली होती. वरळीच्या एका हॉटेलमध्ये आमची भेट झाली होती. मी लोकसभा लढणार म्हटल्यावर सर्व जागे झाले. थेट ओवैसी यांना फोन करण्यात आला. दिल्लीतील नेते थेट ओवैसी यांच्या संपर्कात होते. मी तीन वेळा महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो, अशीही माहिती जलील यांनी दिली.

आम्ही १५ जागा मागितल्या होत्या

ज्या ठिकाणी आम्ही चांगली कामगिरी केलेली आहे, त्याच जागा आम्ही मागत आहोत. भिविंडी, मालेगाव, मुंब्रा यासारख्या जागा मागितल्या होत्या. आम्ही १५ पेक्षा कमी जागा मागितल्या होत्या. ते किती जागा द्यायला तयार आहेत, याबाबत त्यांनी आम्हाला सांगायला हवे होते. आमच्या उमेदवाराविरोधात त्यांनी मुस्लीम उमेदवार दिले आहे, अशी खदखदही जलील यांनी बोलून दाखवली.

ओवैसी यांच्या आदेशाची वाट पाहात आहे

काही दिवासांपूर्वी एमआयएमची जरांगे यांच्यासोबतही चर्चा झाली होती. याबाबत बोलताना जरांगे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली होती. एका जातीला सोबत घेऊन जाणार नाही, असे ते म्हणाले होते. जिथे आम्ही जिंकणार आहोत त्या ठिकाणी उमेदवार देणार आहोत. मी ओवैसी यांच्या आदेशाची वाट पाहात आहे. ओवैसी यांची टीम सर्वेक्षण करत असून ते सांगतील त्या जागा आम्ही लवढवणार आहोत, अशी माहिती जलील यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -