राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी राजकीय पक्षांकडून सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, उमेदवारांवर आणि राजकीय पक्षांवर आयोगाकडून बंधने आली आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे पोस्टर वॉर किंवा जी फलकबाजी व्हायची ती आयोगाच्या निर्बंधामुळे. रस्त्यावर निवडणूक सुरू आहे की नाही हे वातावरण तयार झाले नसले तरी या कालावधीत कोट्यवधी रुपयांच्या रकमा पोलिसांना सापडत असल्याने निवडणुका आणि पैसा यांचा कसा संबंध आहे, याकडे मतदारांचे लक्ष जात आहे. त्याचे कारण आदर्श आचारसंहिता असल्याने मतदारांना पैशांच्या आमिषाने आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी तपास यंत्रणांची करडी नजर असली तरी, निवडणूक काळात होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीचा नेमका अर्थ काय काढायचा याचे कोडे खरे तर निवडणूक आयोगाने सोडवायला हवे, अशी सामान्य मतदारांची अपेक्षा
असू शकते.
तसेच, पोलीस कारवाईत जप्त केलेल्या रकमेची किंवा मालमत्तेचे पुढे काय होते याबाबत सर्वसामान्य नागरिकांना उत्सुकता कायम राहिलेली आहे. त्यात पुण्यातील खेड- शिवापूर टोलनाक्यावर पुणे पोलिसांकडून पाच कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. एका पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारची तपासणी करताना, त्यामध्ये ५०० रुपयांच्या बंडलमध्ये पाच कोटी रुपये सापडले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले असले तरी, त्या गाडीत १५ कोटी रुपये होते, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. आयकर विभागाकडे पुढील चौकशीसाठी ही रक्कम देण्यात आली असली तरी, ती गाडी नेमकी कोणाची होती, कोणत्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा या रकमेशी संबंध होता, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे अशा प्रकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना कुतूहल निर्माण झालेले आहे. दुसरे एक मोठे प्रकरण म्हणजे, पुणे शहरात नाकाबंदी दरम्यान शुक्रवारी संशयित वाहनाची झडती घेताना, १३८ कोटी रुपयांचे सोने पोलिसांना सापडले. हे सोने नेमके कुठून आले? कुठे नेले जात होते? त्याचा मालक कोण? याचा आता पोलिसांकडून शोध सुरू करण्याअगोदर इलेक्ट्राॅनिक माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या. त्यामुळे हे सोने कोणाच्या मालकीचे याची चर्चा झाली. पोलिसांनी नंतर याचा खुलासा केला असला तरी पूर्ण खात्री होईपर्यंत माध्यमांपर्यंत चुकीच्या बातम्या येऊ नये याची खबरदारी निवडणूक आयोगाने घ्यायला हवी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राज्यातील सर्वच प्रमुख शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे, त्यात हे सोन्याचे घबाड सापडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार खबरदारी घेण्यात येते. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांकडून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्या तपासणीत आता सोन्याची भर पडली आहे. कोणतीही निवडणूक आली की खर्च आलाच. जिंकण्यासाठी ‘होऊ दे खर्च’, अशी उमेदवारांची भूमिका असते. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना खर्चाच्या मर्यादा घातल्या आहेत. तसा तपशील प्रतिदिन द्यावा लागतो. यावेळी विधानसभेसाठी खर्चाच्या मर्यादेत निवडणूक आयोगाने वाढ केली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना ४० लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे. यापूर्वी २८ लाख एवढा खर्च मर्यादा होती. यात निवडणूक आयोगाने १२ लाखांची वाढ केली आहे. मात्र, नाकाबंदीत ५ ते १० कोटींची रक्कम सापडत असेल, तर निवडणूक काळात किती पैशांचा पाऊस पडत असेल याचा विचार करता येईल. तसेच, निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी आयोगाने धडक नियोजनाचा भाग म्हणून उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील सीमेवर तपासणी पथक तयार केली आहेत. त्याचवेळी आंतरराज्य सीमेवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. दुसऱ्या राज्यातून अवैध वाहतुकीवर निर्बंध आणले आहे. तसेच सीमा नाक्यावर सीसीटीव्हीही बसवण्यात आले आहेत.
या कडक कारवाईची परिणती म्हणून रविवारी विदर्भात आणखी एक मोठी कारवाई झाली. मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर सुमारे चार कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणूक (२०२४) काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी, आयकर विभागाच्या, पुणे शाखेने २४ x ७ कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला होता. हा नियंत्रण कक्ष दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस (२४ x ७) कार्यरत होता. या कक्षात नागरिकांना त्यांच्या तक्रारी नोंदवता याव्यात यासाठी किंवा पैशांच्या गैरवापराची माहिती देता यावी यासाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सॲॅप क्रमांक देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळातही नाकाबंदीत पैसे जप्त करण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या; परंतु त्यात किती तथ्य आहे. पुढे संबंधित कारवाईबाबत काय झाले याची माहिती मिळत नसल्याने, हा फक्त कारवाईचा फार्स आहे का, अशी शंका निर्माण होण्यास वाव आहे. पोलिसांनी जप्तीच्या केलेल्या कारवाईचा फटका एकाही लोकसभा उमेदवाराला बसल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांचा प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. त्याचवेळी निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे, या पाच कोटींची रक्कम आणि सोने जप्त कारवाईवरून दिसून येत असले तरी, या कारवाईचे पुढे नेमके काय होते, हे पाहणे पुढील काळात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.