राज चिंचणकर
रंगमंचावरचे कलावंत आणि गायक मंडळी यांच्यासाठी स्वतःचा ‘आवाज’ हा अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र ऐन भरात असताना हाच आवाज जर त्यातल्या एखाद्याला सोडून गेला, तर काय होऊ शकते; याचे एक उदाहरण या क्षेत्रात कायम झाले आहे. युवा गायिका व अभिनेत्री कविता जोशी हिच्या बाबतीत अचानक एक विचित्र घटना घडली. तिचा ‘आवाज’च एकदा हरवला; पण त्यानंतर मात्र तिच्यातल्या सकारात्मक ऊर्जेद्वारे तिने जे जे काही केले; त्यातून नाट्य व संगीतक्षेत्राला आता नव्याने गवसलेली ‘कविता’ पाहायला मिळत आहे. तिच्याशी संवाद साधताना तिच्या ‘त्या’ घटनेविषयीच्या भावना कविता व्यक्त करत होती; तेव्हा तिच्या स्वरांतून एका वेगळ्याच आवाजाची चाहूल लागत होती. कविता म्हणते,”आधी मला वाटत होते की माझा आवाज हरवलाय. पण हळूहळू जाणीव होत गेली की माझे बरेचकाही हरवले होते. कदाचित मीच हरवले होते. स्वतःपासून दूर गेले होते. भरकटले होते. पण आत्मविश्वास परत मिळवता मिळवता, मी आत्मशोधाच्या मार्गावर कधी आले ते मलाच कळले नाही. आत्मशोधाच्या मार्गावर माझा प्रवास सुरू व्हावा, आत्मशोधाची तृष्णा माझ्या मनात निर्माण व्हावी; म्हणूनच, तर माझा आत्मविश्वास हरवला नव्हता ना? आत्मशोध घेत राहणे हेच माझे उद्दिष्ट असेल का? तसे असेल, तर हा शोध असाच चालू राहणार. कारण मला मिळालेला मनुष्यजन्म ही एक संधी आहे; ‘कोहं’पासून ‘सोहं’पर्यंत पोहोचण्याची…!”
आवाज म्हणजे कविताचा सखा-सोबती! त्याच जोरावर तिने अनेक गाण्यांच्या, एकपात्री अभिनयाच्या आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. ठिकठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम केले. ‘आकाशवाणी’वर अनेक कौटुंबिक श्रुतिका, मालिकांतून स्वराभिनय केला. अनेक हौशी, व्यावसायिक नाटकांत अभिनय केला. या सगळ्यात तिला तिच्या आवाजाची सतत सोबत होती. यथावकाश तिचे लग्न झाले, गोड मुलगी झाली. तिला गाणी म्हणून दाखवताना, गोष्टी सांगताना तिचा आवाज तिच्यासोबत होता. पण एकदा अचानक कविताच्या घशात वेदना सुरू झाल्या आणि तिला गाता येईनासे झाले. अवघ्या दोन महिन्यांत वेदना इतक्या वाढल्या की तिला एक अक्षरही बोलता येईना. दवाखान्याच्या वाऱ्या सुरू झाल्या. अनेक टेस्ट झाल्या आणि ‘सिंगर्स नोड्यूल’चे निदान झाले. डॉक्टरांनी फर्मान सोडले की आता आवाजाला पूर्णतः आराम द्यायचा. पण दोन वर्षांच्या मुलीला सांभाळताना ‘व्हॉइस रेस्ट’ शक्यच नव्हती. वर्ष उलटले तरी तिला सलग पाच ते सात मिनिटेही बोलता येत नव्हते.
हा सगळा अवघड प्रकार विशद करताना कविता सांगते, “काही काळ नवऱ्याच्या कामानिमित्त आम्ही कॅलिफोर्नियात स्थलांतरीत झालो. आई-बाबा, गुरुजी पं. अरुण कशाळकर, मित्र-मैत्रिणी या सर्वांपासून आपण दुरावल्याची जाणीव होत होती. गाण्यापासूनही दुरावले होते. माझ्या आधीच्या आवाजाशी तुलना करण्यासाठी म्हणून मी अनेकदा स्वर लावून बघत असे. पण आवाजाचा पोत पूर्णतः बदलला होता. स्वर ३ पट्ट्या खाली गेला होता. मला माझा असा आवाज आवडेनासा झाला. माझ्या आशा मावळल्या होत्या. माझ्या मनात प्रश्नांचे काहूर माजले. हे काय होतेय आपल्याला? अनेक साध्या साध्या गोष्टींची आपल्याला भीती का वाटत आहे? हळूहळू लक्षात यायला लागले की ‘सिंगर्स नोड्यूल’चा परिणाम केवळ माझ्या आवाजावरच नाही; तर माझ्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर झाला होता. माझा आवाज माझे सर्वस्व होता. तोच हातातून निसटल्यामुळे मी आत्मविश्वास गमावून बसले होते. नैराश्य आले होते. काय करावे ते कळत नव्हते. पण माझ्यातल्या भीतीला सामोरे जाण्यावाचून गत्यंतर नाही हे लक्षात आले. मग मी नव्याने गाडी शिकायला सुरुवात केली. पोहायला शिकले आणि पोहण्याच्या तीन शैली आत्मसात केल्या. यामुळे थोडा हुरूप आला. पुस्तकाची काही पाने स्वराभिनय करत मोठ्याने वाचायला सुरुवात केली. भारतात परत आले तेव्हा गाण्यापासून निर्माण झालेला दुरावा मिटवून गुरुजींना भेटायला गेले. त्यांच्या पाया पडले आणि माझ्या अश्रूचा बांध फुटला. इतकी वर्षे साचलेले काहीतरी वाहून गेले. सुरुवातीचे काही महिने फक्त सात-आठ मिनिटे सलग रियाज करू शकत होते. यानंतर थेट ९ वर्षांनंतर रसिकांसमोर, गुरुजींसमोर गायन सेवा अर्पण केली. तो आनंद शब्दातीत होता. माझा आवाज, माझा सखा पुन्हा माझ्याबरोबर होता. आता पुढच्या प्रवासात त्याची सोबत मला मिळणार होती. इथे पुन्हा आल्यावर एकांकिका स्पर्धांत सहभागी झाले. त्यातला अभिनय पाहून ‘जन्मवारी’ या नाटकात काम करायला मिळाले आणि मी पुन्हा एकदा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. त्यात दोन गाणी म्हणण्याचीही मला संधी मिळाली. या नाटकातल्या भूमिकेसाठी माझे खूप कौतुक झाले आणि माझ्या आवाजाची ‘वारी’ नव्याने सुरू झाली”.