मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहू लागले असताना सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. अनेक मित्रपक्षाच्या गाठीभेटी सुरु आहेत. अशातच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनंत अंबानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाचे उधाण पसरले आहे.
मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अनंत अंबानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दीड ते दोन तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु यावेळी नेमक्या कुठल्या विषयांवर चर्चा झाल्या ये अद्यापही स्पष्ट झाले नाही.
अंबानी कुटुंबाच्या आधीही झाल्या राजकीय भेटी
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. रात्री साडेदहा वाजता सुरु झालेली बैठक जवळपास दोन तास चालली होती. या बैठकीला तेजस ठाकरेही उपस्थित होते.
त्याचबरोबर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जात अंबानी पिता-पुत्रांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यावेळीही तासभर त्यांची चर्चा सुरु होती.