आता परतीच्या पावसाचा विचार करता, शेतकरी दादाच्या मागील चार महिन्यांच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे असे म्हणावे लागेल. तेव्हा भात पिकाचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाल्याने शेतकरी राजासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी शासन पातळीवर निवडणुकीचे कारण पुढे न करता शेतकरी राजाला तातडीने आर्थिक मदत करणे हे महाराष्ट्र शासनाचे आद्य कर्तव्य आहे.
रवींद्र तांबे
पावसाळा ॠतू जरी संपला तरी अधून मधून पावसाचे आगमन होत आहे. त्यामुळे शेतकरी राजाने खूप मेहनतीने लावलेल्या कोकण विभागातील भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसे इतर विभागामध्ये नुकसान झाल्याचे दिसते. आधीच पाऊस उशिराने सुरू झाला, त्यात अनेक शेतकऱ्यांना दुबारा पेरणी करावी लागली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी खूप कष्टाने मेहनत घेऊन शेती केली. मात्र आता तयार झालेले भातपीक कापणीच्या वेळी तर परतीच्या पावसामुळे मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजाच्या हातातोंडाशी आलेला घास जाणार म्हणून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तेव्हा त्यांना शासकीय आर्थिक मदतीची खरी गरज आहे. आपल्या राज्यात मोठ्या कष्टाने शेतकरी राजाने मेहनत घेऊन शेती केली होती. त्यासाठी बी-बियाणे, खते विकत घेऊन व अंगमेहनतीने शेतकऱ्यांनी शेतीची लागवड केली. त्यात पीक सुद्धा बऱ्यापैकी आले. मात्र ऐन कापणीच्या वेळी परतीच्या पावसाने रात्री व संध्याकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटांत जोरदार हजेरी लावल्याने पिकलेले भात जमिनीवर पडले. त्यामुळे काही ठिकाणी वाफ्यात पाण्यावर भातपीक तरंगताना दिसत असून काही ठिकाणी भाताला कोंब आलेले दिसत आहेत. त्यामुळे दिवाळी आधीच शेतकऱ्यांचे दिवाळे वाजले असे म्हणता येईल. तेव्हा अजूनही पावसाचा जोर कमी झालेला नाही. याचा परिणाम शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकरी राजाला नैसर्गिक संकटातून वाचविण्यासाठी शासनाने आधार द्यायला हवा. ज्या शेतकऱ्याचे अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असेल त्यांचे शासकीय स्तरावर तातडीने पंचनामे करून त्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात आली पाहिजे.
सध्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना शेतकरी राजा मात्र संकटात असताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना आता आधार देणे ही शासनाची जबाबदारी आहे. शेतीच्या लागवडीच्या वेळी बांधावर जाणारे नेते मंडळी आता शेतकऱ्यांच्या संकटाच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहाणे आवश्यक आहे. कारण शेतकरी हाच हक्काचा मतदार असतो. त्यांनी ठरविले की अमुक व्यक्तीला मतदान करायचे, नंतर कोणीही आले तरी आपला शब्द बदलत नाहीत. हे निवडणूक रिंगणात असणाऱ्या नेत्यांना चांगले माहीत आहे. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या संकटात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. इतकेच नव्हे तर तातडीने शासकीय मदत सुद्धा मिळवून दिली पाहिजे. यातच त्यांचा खरा विजय आहे. तेव्हा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या नेत्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता आधार देणे हे त्यांचे पहिले कर्तव्य आहे. कारण आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी खूश तर आपण खूश हे तत्त्व त्यांना माहीत आहे.
पावसामुळे नुकसान तर दरवर्षी होत असले तरी वरकसल न केल्यामुळे जंगली प्राण्यांचा अधिक वावर पाहायला मिळतो. सध्या तर माकडांनी हैदोस घातलेला दिसत आहे. बरीच घरे बंद असल्याने त्यांचे मुक्काम त्या बंद घरात असते. सकाळ झाली की पोटापाण्यासाठी आसपास फिरून संध्याकाळी पुन्हा त्या घरात यायचे म्हणजे शेतीचेच नव्हे तर बंद घरांचे सुद्धा नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांना घर बंद करून कुठे जायला नको लागलीच त्यांच्या घराच्या आसपास शेती केली असेल किंवा बाग केली असेल तर त्याचे नुकसान करतात. तसेच काही शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करतात मात्र शेतकऱ्यांचा डोळा चुकवून भाज्यांचे सुद्धा नुकसान करतात. त्यामुळे आपण जीवन कसे जगावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण होत आहे. आपण मेहनत घेऊन सुद्धा काहीच फायदा नाही असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे शेतकरी राजा आपल्या मुलांना शहराकडे पाठवीत आहेत. याचा परिणाम खेड्यातील कित्येक घरे बंद असताना दिसतात. मी, जेव्हा माझ्या आयनल गावी शेती करायचो तेव्हा सुद्धा हाच प्रकार असायचा मात्र जंगली प्राण्यांचा घरा शेजारी वावर नसायचा. तेव्हा जेवढे भात कापत असू तेवढे घराच्या पडवीत आणून ठेवायचो. तिथेच भात झोडत असू नंतर गवताच्या पेंढ्या बांधून पडवीच्या एका बाजूला ठेवायचो. जेव्हा उन्ह पडत असे त्यावेळी गवत सुखत घातले जायचे तर भात खळ्यावर सुखत घालायचो. ही कामे बहीण लता करायची. आता तर पावसामुळे गवत कुजत असल्याने गुरांना लागणारे गवत कमी पडणार. महत्त्वाची बाब म्हणजे कुजलेल्या गवताला वास येत असल्याने गुरे गवत खात नाहीत. याचा मोठा फटका शेतकरी दादांना होणार आहे. निवडणुका येतील आणि जातील मात्र अशा संकटामध्ये शेतकरी दादांच्या मागे कृषी विभागाने खंबीरपणे पाठीशी उभे राहिले पाहिजे. यातच आपल्या देशाचे खरे भवितव्य आहे. कारण आपल्या देशातील उदरनिर्वाह करणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता आजही दोन-तृतीयांश लोक शेतीक्षेत्रावर अवलंबून आहेत.