युवराज अवसरमल
सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक स्व. सुबल सरकार यांची कन्या नृत्य गुरू डॉ. किशू पाल यांनी नृत्यालिका प्रतिष्ठानच्या भरत नाट्यमच्या शिष्यांना घेऊन ‘वर्तुलम’ हा कार्यक्रम निर्माण व दिग्दर्शित कला आहे. त्यांचे शालेय शिक्षण परळच्या आर. एम. भट शाळेतून झाले. बालपणापासून त्यांना नृत्याची आवड होती. त्या कॉलेजमध्ये असताना वडिलांना नृत्य दिग्दर्शनात सहाय्य करायच्या; परंतु वडिलांनी त्यांना नृत्याचे प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. प्रसिद्ध नृत्यकार वेणू गोपाल पिल्ले यांच्याकडे त्यांनी भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले. मराठी चित्रपटसृष्टीत लावणीला खऱ्या अर्थाने ओळख सुबलजीनी दिली. लोकनृत्य व शास्त्रीयनृत्य त्यांनी सुबलजीकडून शिकल्या.
डॉक्टर व्यंकटेशराव यांच्याकडून हैदराबाद येथे कुचीपुडी नृत्य शिकल्या. रुईया कॉलेज व कीर्ती कॉलेजमधून त्यांचे पुढील शिक्षण झाले. नृत्यालिका ही नृत्यसंस्था त्यांनी स्थापन केली. ‘अस्मिता महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला, त्यामध्ये १२ महिन्यांचे १२ सण त्यांनी सादर केले. त्याचे भरपूर प्रयोग झाले. नंतर त्यांनी पी. एच. डी. केली. त्यात त्यांचा विषय होता भारतीय नृत्योका सांस्कृतिक अनुशीलन. भरतनाट्यमवर दोन पुस्तकेदेखील त्यांनी लिहिली आहेत. ऊर्जा हा कार्यक्रम त्यांनी एनसीपीएमध्ये केला. त्यामध्ये वेगवेगळ्या नृत्य शैलीतील पारंगत नृत्यकाराला बोलावले होते. उदा.भरतनाट्यममधील सुधा चंद्रन, कथ्थक मधील मयूर वैद्य यांसारखे विख्यात नृत्य काराला प्रथमच त्यांनी एकत्र आणले होते. हा कार्यक्रम खूप गाजला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी केले होते.
“वर्तुलम ‘हा सध्या कार्यक्रम खूप गाजतोय. तो त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट आहे असे त्या मानतात. माणसाचा जन्म ते अंत हा प्रवास त्यांनी नृत्यातून या कार्यक्रमात दाखविला आहे. भारतीय नृत्यनाट्याचे जनक कै. उदय शंकर यांनी लोकनृत्य, शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्य यांचा संगम करून एक नवा नृत्याविष्कार आणला होता, तो म्हणजे मुक्त नृत्य शैली. उदय शंकर यांच्या नंतर ही शैली त्यांचे शिष्य कै. सचिन शंकर आणि त्यांच्या नंतर त्यांचे शिष्य कै. सुबल सरकार यांनी जपली. आता सुबल सरकार यांची कन्या नृत्यगुरू डॉ. किशू पाल यांनी या नृत्य शैलीची जपवणूक करण्यासाठी ‘वर्तुलम’ हा कार्यक्रम आपल्या नृत्यलिका संस्थेतील भरतनाट्यमच्या शिष्यांना घेऊन निर्मित व दिग्दर्शित केला आहे. माणसाचा जन्म ते मृत्यू हे एक वर्तुळ असतं. या कालचक्रात तो नाना अवस्थेमधून जात असतो. बाल्य, किशोरावस्था, तारुण्य, मध्यवयीन गृहस्थ आणि नंतर वार्धक्य. या अवस्थांमधून जात असताना त्याने भोगलेले दुःखाचे व सुखाचे क्षण आपल्यासमोर नृत्यातून सादर होत असतात आणि शब्दांचा वापर न करता केवळ पार्श्वसंगीतावर कलाकारांच्या नृत्यविभ्रमातून कथा साकारत असते. ही सर्व सामान्य माणसांची कथा आहे. शेवटी माणूस संपतो आणि नंतर त्याचा पुनर्जन्म होतो. अश्या तऱ्हेने या माणसांच्या पिढ्यान् पिढ्या पुढे जात आहेत हेही नृत्यातून दर्शविले आहे. त्यांना दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी हाच ‘सूनबाईचा भाऊ’ या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी दिली. त्यांच्या नृत्यालीका संस्थेच्या भारतभर व भारताबाहेर शाखा आहेत. शास्त्रीय कला सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. नंतर त्यांनी परंपरा हा कार्यक्रम केला होता. त्यामध्ये त्या, त्यांचे वडील व मुलगा अशा तीन पिढीने नृत्य साकारले होते. ‘आठवणीतले दादा ‘ हा एक टॉक शो त्यांनी केला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंतांनी कै. सुबल सरकारांच्या सहवासातील आठवणी सांगितल्या. वर्तुलम एक अभिनव नृत्याविष्कार हा कार्यक्रम सगळ्यांपर्यंत पोहोचावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांना भावी वाटचालीसाठी व वर्तुलम कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा!