मुंबई : दिवाळी सण काही दिवसांवर येवून ठेपला असून अनेक घरात दिवाळी फराळ बनवण्याची सुरुवात झाली आहे. मात्र ऐन दिवाळीत फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुका मेवा, तेल, तूप, रवा साखर, खोबरे यांच्या दरात वाढ झाली आहे. तेल, तूप, साखर, गूळ, रवा यांच्या किंमती १० ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर सुका मेव्याच्या किंमतीत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, तेल, खोबऱ्यांसह डाळीदेखील महाग झाल्या आहेत.
सुका मेव्याचे दर काय?
- सध्या काजू घाऊक बाजारात ८९५ रुपये तर पिस्ता १ हजार ९० रुपये, मनुके २०० रुपये प्रतिकिलोवर आहेत.
- किरकोळ बाजारात काजूचे दर १ हजार १०० रुपये आहे. चोरोळीचा दर २ हजार ५०० रुपये, वेलची ३ हजार रुपये किलो, खजूर २०० रुपये, पिस्ता १ हजार ८०० रुपये, मनुके ३०० रुपये किलोवर विकले जात आहे.