नाशिक : नाशिक मध्य मतदार संघात शिवसेना उबाठा सेनेला जागा सोडल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्धार व्यक्त करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.
गेल्या निवडणुकीत डॉ. पाटील यांनी ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्यावरही तब्बल ४० हजारपेक्षा जास्त मते प्राप्त केली होती. त्यामुळे या निवडणुकीत लढण्याचा अधिकार आपलाच असल्याचा दावा त्यांनी केला होता; मात्र सदर जागा सोडून वसंत गीते यांना येथे उमेदवारी देण्यात आली आहे.
नाशिक शहरात काँग्रेसला चारपैकी एकही जागा न सोडल्याने संतप्त झालेल्या काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी काँग्रेस भवनला टाळे ठोकत निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर शुक्रवारी डॉ. पाटील यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट करत आपण निवडणुकीत अपक्ष उमेदवारी जाहीर करत असल्याचे जाहीर केले.
या पोस्टमध्ये डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, गेली ३० वर्षे पक्षाचे काम अत्यंत निष्ठेने करत आहे. गेल्या निवडणुकीत माझी कोणतीही तयारी नसताना ऐनवेळी पक्षाने विधानसभेची निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आणि मी केवळ १२ दिवसांमध्ये तब्बल ४६३०० मते मिळवली. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून कॉंग्रेसने मला आश्वासन दिले होते. परंतु शेवटच्या क्षणी ही जागा उबाठा गटाला सोडली. पक्षाला संपूर्ण नाशिक शहरामध्ये चारपैकी एकही जागा वाट्याला आलेली नाही, हे दुर्दैव. म्हणूनच मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याचा निश्चय केला आहे. मतदारसंघाची गेल्या दहा वर्षात झालेली वाताहत डोळ्यांसमोर पहाताना वेदना होत आहेत.