मुंबई: झी मराठी वाहिनीने आतापर्यंत अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. आभाळमाया, वादळवाट अशा अनेक अजरामर मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. झी मराठीसोबत प्रेक्षकांच जुन अतुट नात आहे. त्याच नात्यासाठी झी मराठीने त्यांच्या प्रेक्षकांच्या २५ वर्षांच्या प्रवासासाठी धन्यवाद म्हटलंय.
झी मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये वाहिनीवरील अनेक जुन्या आणि अजरामर मालिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दरम्यान संकर्षण कऱ्हाडेने झी मराठीकडून प्रेक्षकांना लिहिलेल्या खास पत्राचं वाचन झी मराठीच्या मंचावर केलंय.
झी मराठीचं खास पत्र
झी मराठीच्या पत्रात म्हटलं की, ‘प्रिय प्रेक्षकहो…२५ वर्ष एवढी मोठी गोष्ट आहे. आता काळजात काय काय उचंबळून येतंय हे सांगणं कठीण आहे. आयुष्याचा हा एका असा प्रवास आहे जो आपण एकत्र सुरु केला होता, आज त्याच प्रवासाने पंचवीशी गाठली आहे. आज २५ वर्षांनी मनात हा विचार येतोय की, आपण या दोघांमधलं नात म्हणजे नेमकं काय नातं आहोत? मी तुमची सकाळ जागवणारा वासुदेव आहे, मी तुमचा न्याहारीचा डब्बा भरुन देणारा साथीदार आहे…का दुपारी ऊन डोक्यावर आलं तर शांत निजवणारी आई आहे..’
‘संध्याकाळी तुमच्यासोबत बागडणारा उनाड सवंगडी आहे…का बागडून झालं की घरी परत आणणारे आजोबा आहे..अभ्यासाला बसवणारा बाप आहे..का रात्री गोष्ट सांगत शांत निजवणारी आज्जी आहे.. उत्तर हे आहे की, आपल्यातलं नातं हे यातलं सगळंच थोडं थोडं आहे…या २५ वर्षात तुम्ही गोष्टी बघताना तुम्ही हसला असाल,लाजला असाल, तुमच्या डोळ्यांच्या कडाही पाणवल्या असतील.. पण आपण प्रत्येक भावनेचा केला सोहळा, प्रत्येक भावना सोबतीने जगलो..आम्ही नवीन गोष्टींना कायम तुमच्या समोर घेऊन येत राहू.. काय असतं गोष्टींना कान मिळाले, नुसते कान नाही, गोष्टींना ऐकणारे कान मिळाले की, गोष्टींमधली पात्र श्वास घेत राहतात आणि तो श्वास तुम्ही आहात.. हा श्वास निरंतर चालू राहू दे हिच निर्मिताकडे प्रार्थना करतो, मनापासून खूप मनापासून खूप खूप धन्यवाद… तुमचीच लाडकी वाहिनी झी मराठी…’