Friday, December 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAditya Thackeray, Worli Vidhan Sabha: आदित्य ठाकरेंना टक्कर देण्यासाठी शिंदे-फडणवीसांचा 'मास्टर प्लान';...

Aditya Thackeray, Worli Vidhan Sabha: आदित्य ठाकरेंना टक्कर देण्यासाठी शिंदे-फडणवीसांचा ‘मास्टर प्लान’; महायुतीकडून वरळीतून राज्यसभा खासदार मिलिंद देवरांना उमेदवारी?

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना वरळी विधानसभेत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. वरळी विधानसभेत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याविरोधात राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Devra) यांना तिकीट मिळण्याची अफाट शक्यता आहे. मिलिंद देवरा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र मिलिंद देवरा यांना आमदारकी लढण्यासाठी उतरवले जाण्याची चिन्हं दिसून येत आहेत. सध्या वरळी विधानसभेत विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मनसेने संदीप देशपांडे यांची उमदेवारी जाहीर केली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाकडूनही उमदेवार उतरवला जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे वरळी विधानसभेत तिहेरी लढत होण्याची चिन्हं आहेत.

२४ ऑक्टोबरला आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणूक लढणार आहेत. मात्र यावेळी त्यांना महायुती आणि मनसेने घेरण्याची तयारी केल्याचं दिसतंय. महत्त्वाचं म्हणजे मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघाचेही माजी खासदार आहेत. त्यामुळे जर मिलिंद देवरा यांना शिंदे यांच्या शिवसेनेतून मैदानात उतरवलं तर आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिंदे-फडणवीसांचा ‘मास्टर प्लान’

उबाठा गटातून वरळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मनसेनं गेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता. मात्र, आता राज ठाकरे यांची महायुतीशी जवळीक वाढल्यानं त्यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्या पराभवासाठी महायुतीला मदत केली जाऊ शकते. मनसेकडून वरळीत संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, भाजपकडून शायना एनसी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. वरळीचा गड आपल्याकडे घेण्यासाठी आणि आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी या बैठकीत मास्टर प्लान तयार करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात आपला उमेदवार रिंगणात उतरवायचा नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठरवल्याचं समजतंय. त्यामुळे आता राज ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात महायुतील मदत करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -