स्वाती पेशवे
भारत ही बुद्धिवंतांचा सन्मान करणारी भूमी. इथे बुद्धिवंतांची संख्या वाढवण्यासाठी, आपल्याकडील ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक, प्राध्यापक चौकटीबाहेर जाऊन प्रयत्न करतात. समाज अशा प्रत्येकाचा यथोचित गौरव करतो. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रा. डॉ. शिल्पागौरी गणपुले अशांपैकी एक. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा खास परिचय.
आपल्या समाजात सुरुवातीपासून गुरुंना खूप वरचे स्थान दिले गेले आहे. गुरुला देवत्व देऊन पूजा करणाऱ्या आपल्या संस्कृतीने नेहमीच त्याचा सन्मान केला. कालौघात कारकिर्दीची नानाविध क्षेत्रे उदयास आली असली तरी आजही शिक्षण क्षेत्राचे महत्त्व कमी झालेले नाही. मात्र एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे शिक्षणक्षेत्रातील अनानोंदी, दुरवस्था, भ्रष्टाचार, अयोग्य पद्धती समोरे येते तेव्हा कोणतेही संवेदनशील मन व्यथित झाल्याखेरीज राहत नाही. ही नकारात्मकता संपूर्ण समाजासाठी त्रासदायक ठरतेच; खेरीज यामुळे पुढील पिढी गर्तेत अडकण्याचा मोठा धोकाही जाणवतो. म्हणूनच याविषयी तळमळीने काम करणारा शिक्षकांचा मोठा गट कार्यरत होत आहे. देश-विदेशात नानाविध उपक्रम राबवून तेही चुकीची ओळख वा येथील अयोग्य गोष्टी पुसण्यासाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत. प्रा. डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले हे यापैकीच एक नाव. यंदाच्या शिक्षकदिनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही बाबच त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान दर्शवणारी आहे. त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून घेणे अगत्याचे ठरेल.
प्रा. डॉ. शिल्पागौरी शिक्षणक्षेत्राचा वारसा लाभलेल्या कुटुंबातील आहेत. त्यांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि एम. ए. एम. फिल. आणि पीएच. डी. हे पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून घेतले. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडॉलॉजीमध्ये दुसरी पदवी प्राप्त केली. ज्ञानाच्या नवीन मार्गांचा नित्य शोध घेण्याच्या ध्यासातून त्यांनी जगातील नामवंत हार्वर्ड विद्यापीठ, ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी, शवद आणि कॅटॅलिस्ट, अमेरिका इत्यादी विद्यापीठांमधून वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केले. आपल्या प्रत्येक कामातून विद्यार्थ्यांना पुरक ठरणारे, त्यांची सर्वांगीण उन्नती साधणारे उपक्रम राबवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. १९९४ मध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीस सुरुवात केली. मुळातच शिकवण्याची आवड असल्याने त्यांनी शिक्षकी पेशा व्यवसाय म्हणून निवडला.
डॉ. शिल्पागौरी यांनी गेल्या ३० वर्षांमध्ये अगणित विद्यार्थ्यांच्या आकाशगंगेने त्यांचे जीवन समृद्ध केले आहे. त्या चिंचवडमधील आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषद आणि मानविकी विद्याशाखेचे सन्माननीय सदस्य म्हणूनही कार्य केले आहे. सबायोसिस वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या ‘इंग्लिश लैंग्वेज टिचिंग इन्स्टिट्यूट’च्या सल्लागार मंडळाच्या तसेच पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील इंग्लिश अभ्यास मंडळाच्या सदस्या आहेत. त्यांनी हाँगकाँग, श्रीलंका, मॉरिशस, लंडन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, सिंगापूर, रशिया, इटली, इंडोनेशिया, थायलंड, दुबई, यूएई, फिनलंड आणि फ्रान्स येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले असून सत्रांचे अध्यक्षपद भूषवले आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना सर्वोत्कृष्ट शोधनिबंधाचा पुरस्कार मिळाला. हेड्रा रिसर्च असोसिएट्स, ऑस्ट्रिया (२०२१-२०२५)च्या कोविड मेटाफर रिसर्च प्रोजेक्टच्या त्या मुख्य अन्वेषक आहेत. त्यांची सात पुस्तके प्रसिद्ध असून १४ पुस्तके संपादित केली आहेत. तीन पुस्तकांचे भाषांतर आणि ७० पेक्षा जास्त शोधनिबंध नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित होणे, हीदेखील त्यांच्या नावे असणारी मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
सध्याच्या काळात विद्यार्थ्यांपुढे अनेक प्रकारची आव्हाने असल्याचे त्या सांगतात. त्या म्हणतात, ‘बाह्य परिस्थिती बदलण्याची वाट बघण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी आधी स्वत:मध्ये सकारात्मकता वाढवायला हवी. व्यासंग वाढवणे, अभ्यासाची बैठक पक्की करणे आणि आपले ध्येय निश्चित करणे हे या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यासाठी कोणते परिश्रम घ्यावे लागतील, किती मेहनत घ्यावी लागेल, कोणता दृष्टिकोन ठेवायला हवा हे प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवायला हवे. अशाप्रकारे गंतव्य स्थान पक्के असते तेव्हा आजूबाजूला घडणाऱ्या नकारात्मक घटनांकडे आपोआपच दुर्लक्ष होते आणि आणखी एक पूजा खेडकर निर्माण होण्याची शक्यताही कमी होते.’ आपला मुद्दा पुढे नेताना त्या सांगतात, ‘आता शिक्षणक्षेत्रामध्ये घडणाऱ्या परिवर्तनाचाही विचार करायला हवा. लवकरच शिक्षणप्रणालीमध्ये काही मूलभूत बदल होऊ घातले आहेत. आता कौशल्याधिष्ठित शिक्षणाला महत्त्व येऊ लागले आहे. आत्तापर्यंत ही बाब बघायला मिळत नव्हती. पण नव्या बदलामुळे विद्यार्थ्यांना पुढे कुठेही वापराव्या लागणार नाहीत, अशा बाबी शिक्षणातून रद्दबातल होतील आणि त्यातूनच काही सकारात्मक बदलही घडतील. मात्र असे असले तरी अद्यापही आपल्या काही शिक्षणशाखांमध्ये तोकड्या स्वरूपात शिक्षण मिळते. विद्यार्थ्यांच्या गरजा भागवण्यास ते अपुरे असते. अशा शाखांची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. असेच एक उदाहरण संसर्गजन्य आजार पसरवण्यास कारक ठरणाऱ्या जीवाणू आणि विषाणूंवर संशोधन करणाऱ्या एका जवळच्या व्यक्तीचे आहे. ती व्यक्ती हे काम करणाऱ्या अमेरिकेतील ख्यातकीर्त प्रयोगशाळेत कार्यरत होती.
थेट अमेरिकेच्या अध्यक्षांना अहवाल सादर करण्याइतके मोठे अधिकार तिच्या गटाकडे होते. असे असताना तिने भारतात येऊन काम करण्याचा प्रयत्न केला. पण दोन वर्षे काढूनही आपण तिकडे करतो त्या पद्धतीचे काम इथे मिळत नसल्याचे लक्षात आले आणि तिने परतण्याचा निर्णय घेतला. या इच्छेचा आदर राखत अमेरिकेतील संस्थेने तिला सन्मानपूर्वक आमंत्रण दिले आणि आता ती व्यक्ती त्याच संस्थेबरोबर मोठे काम करत आहे. या दोन उदाहरणांवरून आपल्याकडील अद्ययावत शिक्षणाची आणि संधींची गरज अधोरेखित होण्यास हरकत नाही.
डॉ. शिल्पागौरी पुढे सांगतात, ‘मध्यंतरी आमची एका मोठ्या केंद्रीय नेत्याबरोबर चर्चा झाली. त्यावेळी बोलता बोलता त्यांनी आपल्याकडील प्राचीन शिक्षणपद्धतीचा उल्लेख केला. आपल्या जुन्या शिक्षणपद्धती अन्य काही देशांमध्ये अभ्यासक्रमातील अनिवार्य भाग आहेत, पण आपल्याकडे मात्र त्यांची दखलही घेतली जात नाही. ही स्थिती न सुधारल्यास पुढील काळात आपल्याला आपलेच ज्ञान परकीयांकडून शिकावे लागेल. ही उलटी गंगा वाहू द्यायची नसेल तर वैदिक गणितासारखा विषय शाळांमधून शिकवला गेलाच पाहिजे, असा त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ होता. थोडक्यात, जुने ज्ञान नव्याने शिकवूनही आपण मुलांना उत्तम शिक्षण देऊ शकतो. याच अर्थाने मातृभाषेतून शिक्षणाची गरजही लक्षात घेतली जात आहे. मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले तर संकल्पना अधिक योग्य पद्धतीने स्पष्ट होतात आणि आकलनक्षमता वाढते. यातील सत्यता जाणून घेण्यासाठी आपण माजी राष्ट्रपती कलामसरांचे उदाहरण घेऊ शकतो. एका तमिळ शाळेमध्ये शिकणाऱ्या कलामांनी आकाशात विमान पाहिले आणि असेच काहीतरी बनवणार, असे ठरवले. पुढे त्यांनी घडवलेला इतिहास आपण सगळेच जाणतो. संकल्पना स्पष्ट असतील तर भाषेचे बंधन आड येत नाही, हे दाखवून देणारे हे एक मोठे उदाहरण आहे. संपूर्ण शिक्षणप्रणालीमध्ये हा बदल घडला तर पुढील पिढीचे शिक्षण अधिक सखोल आणि परिणामकारक होऊन त्यांच्या बुद्धीची कवाडे विस्तारण्यास मदत होऊ शकेल.’ प्रत्येक समाजात ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्ग असतो. पण आता या दोहोतली सीमारेषा अंधुक होत आहे. ‘नाही रे’ वर्ग बऱ्यापैकी ‘आहे रे’ वर्गात आला आहे. मात्र प्रवेशावेळी होणाऱ्या गोंधळामुळे चांगला विद्यार्थी शिक्षण चक्राबाहेर राहतो. काही वेळा शिक्षणाक्षेत्रातील राजकारणाची व्याप्तीही त्रासदायक ठरते. जातीपातीचे राजकारण अनेकांना या चौकटीतून बाहेर काढते. ब्रेन ड्रेनमागील हे एक कारणही लक्षात घेण्याजोगे असून विद्यार्थ्यांना थांबवण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे, असे मत त्या चर्चेचा समारोप करताना व्यक्त करतात. मागील ३० वर्षे शिक्षकी पेशात काम करणाऱ्या या हाडाच्या शिक्षिकेचे हे तळतळीचे बोल आवर्जून विचारात घेण्याजोगे आहेत. नवीन शिक्षण धोरणाचे स्वागत करताना शिक्षकांनी विद्यार्थी घडवण्याबरोबरच चांगला नागरिक घडवण्याचा संकल्प सोडला तर सध्या दाटलेले मळभ दूर होऊन सरस्वतीचा प्रासाद पूर्वीच्या झळाळीने झळकेल, यात शंका नाही.