भारतामध्ये एआयचा मूलभूत पाया तयार करण्यासाठी रिलायन्स आणि एनविडिया एकत्र काम करणार
मुकेश अंबानी आणि जेनसेंग हुआंग यांनी केली घोषणा
मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील जागतिक कंपनी एनविडियाचे प्रमुख जेनसेंग हुआंग आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी घोषणा केली आहे की दोन्ही कंपन्यांनी भारतात एआय आणण्यासाठी एक करार केला आहे. त्यांनी ही घोषणा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे केली, जिथे (२३ ते २५ ऑक्टोबर) ‘एनविडिया समिट इंडिया’ कार्यक्रम चालू आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ आता जगातील सर्वात मोठी डेटा कंपनी बनली आहे. एनविडियाचे संस्थापक आणि सीईओ जेनसेंग हुआंग यांनी घोषणा केली की रिलायन्स आणि एनविडिया भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चे इंफ्रास्ट्रक्चर तयार करत आहेत. ही भागीदारी भारताला एआयच्या क्षेत्रात अग्रगण्य देश बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.
भारतामध्ये जेनसेंग हुआंग यांचे स्वागत करताना मुकेश अंबानी म्हणाले की, भारताच्या मोठ्या स्वप्नांमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारत आज डिजिटल क्रांतीच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. एनविडियाचे संस्थापक आणि सीईओ जेनसेंग हुआंग यांनी भारताला डीप टेक्नॉलॉजी हब बनविण्यातील मुकेश अंबानी यांचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे सांगितले. भारताच्या आयटी क्षेत्राच्या क्षमतेचे कौतुक करताना हुआंग म्हणाले, “जगात खूप कमी देश आहेत जिथे संगणक विज्ञान आणि आयटी क्षेत्रातील इतके प्रशिक्षित लोक आहेत.” जेनसेंग हुआंग म्हणाले, “ही एक असाधारण वेळ आहे, जिथे भारताकडे संगणक अभियंते आणि मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे. या भागीदारीसाठी मुकेश अंबानी यांच्यासोबत काम करण्याचा मला सन्मान वाटतो.”
मुकेश अंबानी यांनी जेनसेंग यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचावा असे नव्हे तर तो किफायतशीर दरात उपलब्ध असावा. मुकेश अंबानी म्हणाले की, आपल्या सध्याच्या फोन आणि संगणकावर एआय उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही नवीन तंत्रज्ञान लोकांपर्यंत सहजतेने पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे आणि आपल्याला एकत्रितपणे हे साध्य करावे लागेल.
मुकेश अंबानी म्हणाले की, एआय ही एक ज्ञानक्रांती आहे ज्यामुळे जागतिक समृद्धीचे दार खुले होते. त्यांनी सांगितले की, भारतातील तरुणांची मोठी लोकसंख्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने देशाला डिजिटल समाजात रूपांतरित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अंबानी म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. भारत वेगाने जगातील इनोवेशन हब बनत आहे आणि आपल्याकडे जगातील सर्वोत्तम डिजिटल कनेक्टिव्हिटी इंफ्रास्ट्रक्चर आहे.
ते म्हणाले की, रिलायन्स जिओ जगभरात सर्वात मोठी डेटा कंपनी आहे. त्यांनी सांगितले की, ही १५ सेंट प्रति जीबीच्या कमी किंमतीत डेटा पुरवते, तर अमेरिकेमध्ये यासाठी पाच डॉलर्स प्रति जीबी खर्च येतो. त्यांनी सांगितले की, जसा जिओने डेटा क्षेत्रात क्रांती केली, तशीच क्रांती आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आणण्याची गरज आहे.