मुंबई: भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यामध्ये खेळवला जात आहे. सामन्यामध्ये आज दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची अग्निपरीक्षा असणार आहे. जर आज भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले तर दुसरा कसोटी सामना आणि मालिका दोन्ही गमावण्याची भीती आहे.
खरंतर, पुणे कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजांचा बोलबाला राहिला. सर्व १० विकेट स्पिनर वॉशिंग्टन सुंदर आणि रवीचंद्रन अश्विन यांनी मिळवले. ऑफ स्पिनर सुंदरने ५९ धावा देत सर्वाधिक ७ विकेट घेतल्या तर अश्विनने ६४ धावांमध्ये ३ विकेट आपल्या नावे केले.
भारतीय संघाला घ्यावी लागेल मजबूत आघाडी
यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात बॅटिंग करण्यासाठी उतरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने १ विकेट गमावत १६ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माला खातेही खोलता आले नाही. यशस्वी जायसवाल ६ आणि शुभमन गिल १० धावा करून नाबाद राहिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ आज सुरू होत आहे.
भारतीय संघ पहिल्या डावात अद्याप २४३ धावांनी पिछाडीवर आहे. जर त्यांना या सामन्यात आपली पकड मजबूत करायची असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पुण्याची ही पिच स्पिनर्ससाठी फायदेशीर आहे.
सोबतच संघाला चौथ्या डावातही फलंदाजी करावी लागेल. अशातच रोहित ब्रिगेडला कमीत कमी १५० धावांची आघाडी घ्यावीच लागेल. याची सर्व जबाबदारी विराट कोहली, शुभमन गिल, सर्फराज खान, ऋषभ पंत, आणि रवींद्र जडेजा यांच्यावर असेल. जर भारतीय संघ २५९ धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला तर न्यूझीलंडकडे सामना आणि मालिका जिंकण्याची संधी आहे.