नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी उद्योगधंदे वाढवण्याचा विचार करणाऱ्या उद्योजकांना मोदी सरकारने (Modi Governmnet) मोठी भेट दिली आहे. आता त्यांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Mudra Yojana) पूर्वीपेक्षा दुप्पट कर्ज मिळू शकणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत, मुद्रा कर्जाची (Mudra Loan) मर्यादा सध्याच्या १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचनाही जारी केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी २३ जुलै २०२४ रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत १० लाख रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून २० लाख करण्यात येईल . आता या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, ही मर्यादा वाढवल्याने मुद्रा योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल आणि अशा नवउद्योजकांना ज्यांना निधीची गरज आहे ते आता त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी अधिक निधी देऊ शकतील.
सध्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन श्रेणी आहेत ज्या अंतर्गत कर्ज दिले जाते. आता तरुण प्लस नावाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. मुद्रा योजनेंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. किशोर योजनेअंतर्गत, व्यवसाय करणारे ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतचे मुद्रा कर्ज घेऊ शकतात. तरुण योजनेंतर्गत ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा नियम आहे. तरुण योजनेंतर्गत घेतलेले कर्ज यशस्वीरीत्या परत केलेल्या व्यावसायिकांना आता त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी तरुण प्लस श्रेणी अंतर्गत १० लाख ते २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे.