कर्जत विधानसभेत चुरस
– विजय मांडे
विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. कर्जत विधानसभा निवडणुकीत यावेळी राजकीय परिस्थिती काय असेल? याची भाकिते चौका चौकातच नव्हे, तर आगदी आदिवासी पाड्यातील चौथऱ्यांवर सुद्धा होऊ लागली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. भल्या भल्यांना एखादा प्रमुख कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नक्की कोणत्या पक्षाचा आहे? हे सांगता येणार नाही कारण प्रत्येक आठवड्याला सर्वच पक्षांचे पक्ष प्रवेश होत असतात. त्यात पदाधिकारी व कार्यकर्ते आज इथे तर दुसऱ्या आठवड्यात आणखी कुठे जात असल्याने हे सांगणे कठीण आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधानसभेची निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. मात्र कर्जत विधानसभा मतदारसंघात ही जागा आमचीच आहे. आम्हालाच मिळणार या दाव्या प्रतिदाव्यामुळे तसेच उमेदवारी वरून महायुतीत चाललेल्या रस्सीखेचीमुळे ही निवडणूक चौरंगी किंवा बहुरंगी होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्ष दुभंगला आणि राष्ट्रवादी काँग्रेस उदयास आली. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाबरोबर युती केल्याने सुरेश लाड पहिल्यांदा विधानसभेत गेले. त्यावेळी त्यांनी देवेंद्र साटम यांची हॅटट्रिक हुकवली. तर २००४ साली परतफेड करताना देवेंद्र साटम यांनी विजयश्री खेचून आणली आणि सुरेश लाड यांची हॅटट्रिक होऊ दिली नाही. सध्या साटम आणि लाड एकाच पक्षात म्हणजे भारतीय जनता पक्षात आहेत. हा नियतीचा खेळ आहे यात शंका नाही. महेंद्र थोरवे यांच्या बद्दल बोलायचे, तर त्यांनी २०१४ साली शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने आयत्या वेळी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांचा अवघ्या अठराशे मतांनी निसटता पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांनी ते पुन्हा स्वगृही परतले आणि मतदारसंघाचा अभ्यास करून पक्ष बळकट केला. त्यांच्या या मेहनतीला यश आले आणि त्यांनी २०१९ च्या विधानसभेत शिवसेनेची उमेदवारी मिळवून सुरेश लाड यांचा तब्बल अठरा हजार मतांनी पराभव करून २०१४ च्या पराभवाची अगदी दहा पट मताधिक्याने परतफेड केली.
गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्याच्या राजकारणात खूप बदल झाले. कुणाला आवडले कुणाला पचनी पडले नाहीत. मात्र सध्याचे कर्जत विधानसभा मतदारसंघातील राजकारण राज्यात कोणत्याही मतदारसंघात नाही अशा परिस्थितीचे आहे. शिवसेनेत दुफळी झाली. शिंदे गट आणि ठाकरे गट अशी विभागणी झाली. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर साधारण वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. अजित पवार गट आणि शरद पवार गट झाला. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे तिसऱ्यांदा लोकसभेत गेले. मात्र त्यांचे मताधिक्य कमी झाले.
या निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेना, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष महायुतीत असल्याने कर्जत मतदारसंघात बारणे यांना खूप मताधिक्य मिळेल असे वाटत होते. कारण तीन मातब्बर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित आणले होते. मात्र झाले उलटेच महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांना केवळ ७५ हजार ५३४ मतांवर समाधान मानावे लागले आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार संज्योग वाघेरे-पाटील यांना ९३ हजार १९४ मते मिळाली. त्यामुळे या मतदारसंघात विजयी झालेल्या श्रीरंग अप्पा बारणे सतरा हजार ५६० मतांनी पिछाडीवर राहिले. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. महायुतीतील पक्ष एकमेकांकडे संशयाने पाहू लागले.
लोकसभा निवडणुकीत आम्ही एक दिलाने निवडणूक रिंगणात उतरलो आहोत असे म्हणत असताना प्रत्येकाने आपल्या परीने वेगवेगळा प्रचार केला. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. सर्वच ठिकाणी पक्ष प्रवेशाच्या मालिका सुरू आहेत. महायुतीबद्दल बोलायचे झाले, तर सध्या महेंद्र थोरवे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे ते २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडी मध्ये ठाकरे गटाच्या नितीन सावंत यांची उमेदवारीही निश्चित मानली जाते कारण पक्ष फुटीनंतर त्यांनी त्यांचा पक्ष सक्षम केला म्हणूनच या मतदारसंघात पक्षाची निशाणी नवीन असूनही लोकसभा निवडणुकीत चांगली आघाडी घेतली. कालच त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. महायुतीत उमेदवारांची कमतरता नाही.
अजित पवार गटाचे सुधाकर घारे गेल्या दोन-अडीच वर्षांपासूनच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविले होते. त्यामुळे त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याशी सलोखा आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी असे त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाटते. महायुती अभेद्य राहिली, तर घारे यांना वेगळा पर्याय निवडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुतारी चिन्ह घेऊन लढविण्याचे प्रयत्न केले. तसेच उबाठा सेनेमधूनही उमेदवारी मिळविण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करीत होते; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन अपक्ष निवडणुक लढविण्याचे जाहीर केले असून ते २५ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
इकडे भारतीय जनता पक्षामध्ये सुध्दा उमेदवारी लढविण्याची तयारी सुरू आहे. भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, किसान सेलचे सुनील गोगटे इच्छुकांच्या रांगेत आहेत. ठाकरे यामध्ये पुढे आहेत. त्यांनी मतदान बुथची चाचपणी सुद्धा केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटीलसुद्धा वरून आदेश आल्यास निवडणूक रिंगणात असतील. गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या परंपरे नुसार कोणत्याही पक्षाचा इच्छुक उमेदवार निवडणूक लढवायचीच या इर्षेपोटी आयत्यावेळी पक्ष बदलून कोणत्याही पक्षाची उमेदवारी घेऊ शकतो. सारे काही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी स्पष्ट होईल.