संतोष वायंगणकर
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाला बरोब्बर ३२ दिवस शिल्लक राहिले आहेत. २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेसाठी राज्यात एकाचवेळी मतदान होईल आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन महाराष्ट्रात सत्ता कोणाची या प्रश्नाचे उत्तर देखील जनतेने दिलेले असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास ५० वर्षे काँग्रेसची सत्ता राहिली आहे. या सत्तेच्या काळात काँग्रेसी विचारधारेतील स्व. बाळासाहेब सावंत कोकणचे नेतृत्व करीत होते. स्व. बॅ. ए. आर. अंतुले व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मान प्राप्त केला; परंतु राज्यातील काँग्रेसच्या कोकणद्वेषी नेत्यांमुळे बॅ. ए. आर. अंतुले यांना मुख्यमंत्रीपद फक्त १८ महिन्यांच्या कालावधीपुरते भूषविता आले, तर खासदार नारायण राणे आठ महिने मुख्यमंत्रीपदी राहिले. कोकणच्या विकासप्रक्रियेत अनेकांनी त्यांच्या-त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे हातभार लावला. बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते, स्व. बाळासाहेब सावंत, माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले, भाईसाहेब सावंत, ॲड. एस. एन. देसाई, बापूसाहेब प्रभुगावकर, श्यामराव पेजे अशा अनेकांनी त्यांना शक्य असलेला आणि त्यांच्या दृष्टिकोनातला विकास करण्याचा, कोकणाला काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न निश्चितच केलेला आहे. परंतु या सर्वाला काही मर्यादा होत्या. त्याचे कारणही तसेच होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात आणि सत्ताकारणात नेहमीच वरचष्मा राहिला तो पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्राला आपापसात भांडल्यासारखे दाखवतील. परंतु ते सगळेच वरवरचे असते. जेव्हा पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा विषय येतो तेव्हा ते सारे मतभेद बाजूला सारून आपल्या भागासाठी निधी कसा वळवता येईल एवढेच पहात असतात. यामुळे कोकणाला देताना सत्तास्थानी असणाऱ्यांनी उपकार केल्यासारखे द्यायचे ही फार जुनी रित आहे. म्हणूनच आठ-दहा मंत्री हे केवळ पश्चिम महाराष्ट्राचे असायचे. कोकण विदर्भाचा समतोल, बॅकलॉग कधीच दिला गेला नाही. तसाच राहिला. साखर उद्योगासाठी गेली अनेक वर्षे अनुदान दिले जाते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही वर्षानुवर्षे नुकसानभरपाई दिली जाते. लाभ खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रानेच घेतला. उर्वरित महाराष्ट्राला हा लाभ कधीच मिळाला नाही. परंतु कोकणच्या बाबतीत हे चित्र खऱ्या अर्थाने १९९० नंतर बदलले. १९९० साली शिवसेनेचे आमदार म्हणून नारायण राणे निवडून आले आणि १९९० नंतर कोकणचे चित्र पूर्णत: बदलले. महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या कोकणाला एक अभ्यासू, धडाकेबाज, निर्णयक्षम आणि तितकाच सहृदयी असलेला नेता लाभला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ज्यांच्या शब्दाला किंमत असते अशा नेतृत्वाचा उदय नारायण राणेंच्या रूपाने झाला. १९९० नंतर कोकणचे राजकारण, समाजकारण झपाट्याने बदलून गेले. समाजवादी विचारसरणीचा पगडा असलेले कोकण शिवसेनेच्या विचारांशी कधी जोडले गेले हे कोकणालाही कळले नाही आणि कोकणातील राजकीय चित्र बदलले गेले.
नारायण राणे नावाच्या वादळाने ही सारी किमया केली. कोकणात असंख्य कार्यकर्त्यांना विविध पदांवर विराजमान केले. जसे कार्यकर्त्यांच्या बळावर नारायण राणे आमदार, खासदार होऊ शकले त्याबरोबरच सर्वसामान्य अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी कधी विचारही केलेला नसेल अशा पदांवर विराजमान केले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नाळ घट्ट होती आणि आहे म्हणूनच ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्ता ‘मी दादांचा कार्यकर्ता’ दादांचा माणूस म्हणून एखादे पद असल्याच्या अाविर्भावात मिरवताना दिसतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये तर गावो-गावचे अनेकजण जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, तर पंचायत समितीत सभापती पदांवर अनेकजण दिसू शकले. नगराध्यक्ष, नगरसेवक या अशा स्वायत्त संस्थामध्ये पदाधिकारी म्हणून अनेकांना मानाचं पान मिळू शकले. नारायण राणे यांनीच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेकांना पदांवर विराजमान केले.
नारायण राणे नामक वटवृक्षाच्या छायेखाली असंख्यानी विसावा घेतला. याच वटवृक्षाच्या छत्रछायेखाली अनेकांच्या नेतृत्वाचा उदय झाला. अनेक नावारूपाला आले. वटवृक्षाच्या सावलीखाली आपण जेव्हा उभे असतो तेव्हा त्या शितलतेचा आपण प्रसन्न मनाने आनंद घेतो. जेव्हा वटवृक्षाच्या सावली सोडून मार्गस्थ होतो तेव्हा आपणाला खऱ्या अर्थाने वटवृक्षाच्या छायेची किंमत समजून येते. प्रत्येक माणसाचे मन नेहमीच खरे बोलत. आपले मन कधीच आपणाला फसवत नाही आणि खोटही बोलत नाही. वटवृक्षाच्या छायेने अनेकांना मोठे होतानाही पाहिले. ते पाहातानाही त्या वटवृक्षालाही मनस्वी आनंदच झाला आणि होतो. कोकणात हा वटवृक्षाचे रोपटे आले कधी, या रोपट्याचं वटवृक्षात झालेलं रूपांतर कोकणवासीयांनी पाहिले, अनुभवलंय त्याचे साक्षीदारही कोकणातील जनताच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा परिघ कशाही पद्धतीने फिरला तरीही कोकण आणि नारायण राणे हे याच परिघाचे केंद्रबिंदू असतील यात शंका नाही.