पुणे : राज्यभरातील सर्व विमानतळांवर विमानात बॉम्ब ठेवल्याची तसेच विमाने उडवण्याची धमकी (Bomb threat) देणारे प्रकरण सातत्याने वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वी दहशतवादी पन्नूने एअर इंडियाची विमाने उडवण्याची धमकी दिली होती. या धमक्यांमुळे हवाई वाहतूक विभाग, विमानतळे आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच आता एका अज्ञाताकडून पुणे विमानतळावरील विमाने उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील विमान क्षेत्रात नामांकित असलेल्या कंपनीच्या मॅनेजरला एक मेल आणि एक्स पोस्टद्वारे विविध ठिकाणी निघालेले ११ विमाने उडवण्याची धमकी दिली. दिल्ली ते पुणे आणि पुणे ते कलकत्ता यासह वेगवेगळ्या शहरात निघालेल्या विमानात बॉम्ब असून बॉम्ब थोड्याच वेळात ब्लास्ट होणार अशी धमकी अज्ञाताने दिली.
दरम्यान, या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून कडक तपास केला जात आहे.