Sunday, December 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSameer Bhujbal : समीर भुजबळांचा मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा, अपक्ष निवडणूक लढणार

Sameer Bhujbal : समीर भुजबळांचा मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा, अपक्ष निवडणूक लढणार

मनमाड : नाशिक जिल्ह्यात खऱ्या अर्थाने विधानसभेच्या रणधुमाळीला गुरुवारी सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत नांदगाव मतदार संघात अपक्ष म्हणून अर्ज भरून विद्यमान आमदार सुहास कांदे यांना आव्हान तर दिलेच, शिवाय बंडखोरी करत महायुतीलाही तडाखा दिला. गुरूपुष्यामृताचा मुहूर्त साधत अनेक दिग्गज उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. त्यात मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा प्रामुख्याने समावेश होता.

मला आमदारकीचा मोह नाही पण नांदगावमध्ये असलेले दूषित वातावरण बदलण्यासाठी पुढाकार घेणारच. असे ठामपणे सांगत नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढविणार असल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली.

समीर भुजबळ यांनी मनमाड येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी ते म्हणाले की, १९८५ पासून भुजबळ साहेब राजकारणात आहेत, अनेक वर्ष मंत्री आहेत. नांदगाव मध्ये पंकज भाऊ आमदार होते. मी देखील नाशिकचा खासदार होतो. या माध्यमातून नाशिकमध्ये एअरपोर्ट असेल, उड्डाणपूल, रिंग रोडचे काम असेल पाण्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न हाती घेऊन मी सोडविले आहेत. अनेक विकासकामे माझ्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात वेळोवेळी झालेली आहेत.

नाशिक येथे नुकतेच आशिया अखंडातील सर्वात भव्य दिव्य असे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे आपण बसविले आहेत. त्यामुळे सत्ता किंवा आमदारकी यापैकी कोणत्याही गोष्टींचा मोह मला नाही पण येथील नागरिकांची मागणी आणि दुषित आणि भयभीत असलेले वातावरण बदलण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, मी महायुतीकडे म्हणजेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडे उमेदवारी मागितली होती. नांदगावच्या लोकांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अजितदादा पवार यांच्याकडे जाऊन नांदगाव तालुक्यातील वस्तुस्थिती मांडली होती. सध्याच्या विद्यमान आमदारांनी अन्यायाची भूमिका घेतली आहे. फक्त आमच्याच बाबतीत नाही तर सर्वच पक्षाच्या बाबतीत विद्यमान आमदारांनी अन्याय आणि दबावतंत्र वापरले आहे. खोट्या तक्रारी देणे, लोकांना धमक्या देणे, विकासकामे होऊ न देणे असे उद्योग या मतदारसंघात सुरू आहेत. त्यामुळे या भागातील लोकांचा उद्रेक झाला आणि त्यांनी मला विनंती केली की मी या भागात उमेदवारी करावी म्हणून मी या ठीकाणी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महायुती आहे आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजीतदादा पवार आणि पक्षातील नेत्यांना कुठेही अडचण नको म्हणून मी माझा राजीनामा पक्षाला पाठवला असल्याची माहिती समीर भुजबळ यांनी यावेळी दिली. व नांदगाव तालुका दहशत व भयमुक्त करायचा असेल तर आपण सर्व मतदारांनी, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मला साथ देणे गरजेचे आहे असे आवाहन देखील केले.

दरम्यान, काही मतदार संघांमध्ये उमेदवारीवरून महायुती व महविकास आघाडीमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. नेहमीच अतिशय चर्चेत असलेल्या निफाड मतदार संघात विद्यमान आमदार दिलीप बनकर यांची उमेदवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप अंतिम न करण्यात आल्याची चर्चा होत असतानाच बनकर यांनी गुरुवारी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीला भाजपचे यतीन कदम यांनी विरोध दर्शवला असल्याने महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. अजित पवार यांच्या पक्षाने बहुतांश विद्यमान आमदारांना तिकीट दिल्याने बनकर यांच्या गोटात अस्वस्थता तयार झाली होती. दुसरीकडे, महाविकास आघाडीने उबाठा गटाचे अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे.

झिरवळ यांची वाढली डोकेदुखी

नांदगाव या आणखी एका हाय प्रोफाइल मतदार संघात तिरंगी सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. महायुतीने शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना, तर महाविकास आघाडीने उबाठा गटाचे गणेश धात्रक यांना मैदानात उतरवले आहे. अशातच, समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केल्याने येथील निवडणूक सर्वार्थाने गाजण्याचे संकेत मिळाले आहेत. पुढील आठवड्यात समीर हे शक्ती प्रदर्शन करून पुन्हा एकदा अर्ज भरणार आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना माजी आमदार धनराज महाले व सुनीता चारोसकर यांनी अर्ज भरत आव्हान दिले. महाले हे शिंदे गटाचे असल्याने येथेही महायुतीत अंतर्गत वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. चारोसकर या पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. त्यामुळे झिरवाळ यांची डोकेदुखी वाढली आहे.

सांगली पॅटर्न राबविणार असल्याची चर्चा

नाशिक मध्य या मूळ शहराचा समावेश असलेल्या मतदार संघात अशाच समस्येचा सामना महाविकास आघाडीला करावा लागतो आहे. ही जागा उबाठा गटाने काँग्रेसकडून हिरावून घेत माजी आमदार वसंत गिते यांना उमेदवारी घोषित केली आहे. गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या काँग्रेसच्या हेमलता पाटील या त्यामुळे नाराज झाल्या असून त्यांनी लोकसभेचा सांगली पॅटर्न राबवण्याची व त्याला पक्षाची अनुमती न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. या मतदार संघात विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर न केल्याने सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेही उमेदवाराची प्रतीक्षा करत आहेत.

दिनकर पाटील मनसेचे उमेदवार

पश्चिम नाशिकमध्ये आमदार सीमाताई हिरे यांना तिकीट मिळाल्याने संतापलेल्या दिनकर पाटील यांनी तातडीने मुंबई गाठत मनसेत प्रवेश करून उमेदवारीही प्राप्त केली आहे. पूर्व नाशिकमध्ये भाजपने आमदार राहुल ढिकले यांना उमेदवारी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर आघाडीला अद्याप उमेदवार निश्चित करता आलेला नाही. देवळालीतही आघाडीची परिस्थिती अशीच आहे. तेथेही अनेक इच्छुक असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाव अंतिम करण्यात अडचणी येत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -