सलग ८ दिवस प्रचाराचा धुरळा
मुंबई/नवी दिल्ली : राज्यात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम रंगणार आहे. निवडणूक अवघ्या एक महिन्यावर असल्याने प्रत्येक मतदारसंघात आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष आता जोमाने कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. नुकताच राज्यातील विविध पक्षांकडून निवडणुकीतील उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. तर महायुतीत भाजपने यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली होती. तर आता उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ कधी फोडायचा याचे नियोजन केले जात आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरणार आहेत.
निवडणूक वेळापत्रकाप्रमाणे २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी केवळ २५ दिवसांचा अवधी राहिला आहे. उमेदवारी जाहीर होताच आता सर्वच पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका लावलेला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात सुरुवात झाली आहे. आजही अनेक उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून आजपासूनच शक्तीप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रीयपणे भाग घेणार आहेत. यासाठी राज्यात ते सलग ८ दिवस तळ ठोकून असणार आहेत.
नोव्हेंबर महिन्यातील ७ ते १४ तारीख असे सलग ८ दिवस ते महाराष्ट्र दौऱ्यावर असणार. यादरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतील. राज्यात ते विभागवार सभा घेणार आहेत आणि मतांसाठी मतदारांना साद घालणार आहेत. कमीत कमी वेळेत अधिक सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल याकडे महायुतीचे विशेष लक्ष असणार आहे. तर महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी मॅजिक काम करुन जाईल का पाहणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान लोकसभेप्रमाणेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यासोबतच परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही स्वबळावर लढत असल्याने त्यांचेही या पक्षांसमोर आव्हान असणार आहे. महायुतीकडून आतापर्यंत १८२ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात भाजपकडून ९९, शिवसेना शिंदे गटाने ४५ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने ३८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.