Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीअरे देवा! लालबागचा राजा आणि सिद्धिविनायक नवसाला पावलाच नाही, आता पुढे काय?

अरे देवा! लालबागचा राजा आणि सिद्धिविनायक नवसाला पावलाच नाही, आता पुढे काय?

साळवींना तिकीट नाकारल्याने लालबागमध्ये शिवसैनिक आक्रमक, शिवसेना शाखेसमोर घोषणाबाजी

मुंबई : शिवडी मतदारसंघातून (Shivadi Assembly constituency) शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार अजय चौधरी आणि विभाग संघटक सुधीर साळवी यांच्यात उमेदवारीसाठी प्रचंड चुरस होती. अखेर मातोश्री येथे तासाभराच्या बैठकीनंतर विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाला. उमेदवारीसाठी सुधीर साळवी देखील प्रचंड इच्छुक होते. सुधीर साळवी हे लालबागचा राजा ट्रस्टचे मानद सचिव आहेत. गेल्या दोन वर्षापासून ते विधानसभेची तयारी करीत होते. शिवडी विधानसभेसाठी सुधीर साळवींच्या समर्थकांनी सिद्धिविनायकाच्या चरणी चिठ्ठी अर्पण करून साकडे घातले होते. लालबागच्या राजाच्या चरणीही अशीच एक चिठ्ठी अर्पण केली होती. मात्र, लालबागचा राजा आणि सिद्धिविनायक साळवींच्या नवसाला पावलाच नाही. उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार चौधरी यांनाच उमेदवारी दिल्याने साळवी यांचा प्रचंड हिरमोड झाला.

मुंबईतील शिवडी-लालबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच पुन्हा उमेदवारी घोषित केल्यामुळे नाराज शिवसैनिक मोठ्या संख्येने लालबाग शिवसेना शाखेसमोर जमा झाले. जोरदार घोषणाबाजी करून शिवसैनिक सुधीर साळवी यांना पाठिंबा दर्शवित आहेत. विभाग संघटक सुधीर साळवी यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक शिवसैनिक करत आहेत. तर सुधीर साळवी मात्र जमलेल्या सर्व शिवसैनिकांची समजूत काढत आहेत. मात्र ही बातमी लालबाग-परळ परिसरात वा-यासारखी पसरली आणि सगळीकडूनच तीव्र असंतोष पहायला मिळत आहेत.

शिवडी मतदारसंघाचा वाद मातोश्रीवर गेला होता. गेल्या काही दिवसांपासून शिवडीचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारासंदर्भात आज महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी शिवडी विधानसभेतील पाच पैकी पाच शाखाप्रमुखांनी सुधीर साळवींच्या बाजुने भूमिका घेतली. युवासेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनी देखील सुधीर साळवींच्या बाजुने कौल दिला.

परंतु अजय चौधरी जुने नेते आणि बंडखोरीत उद्धव ठाकरेंसोबत थांबल्याने मातोश्रीने आता अजय चौधरींच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. शिवसेना पक्ष फुटलेला असताना माझ्यासोबत काही मोजके शिलेदार राहिले. त्यापैकीच एक म्हणजे लालबागचे आमदार अजय चौधरी. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याने अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी देत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ठाकरेंच्या निर्णयाचे पडसाद शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग परळमध्ये गुरुवारी रात्री उमटायला सुरुवात झाली.

दरम्यान, यानंतर शिवडीतून उमेदवारी मिळवण्यासाठी नवस बोललेले सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला त्यानंतर ते तेथून बाहेर पडले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर सुधीर साळवी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मी संघटनेशी एकनिष्ठ राहणार असल्याचे सुधीर साळवी म्हणाले आहेत.

शिवडी विधानसभेत मनसेकडून बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -