पुणे: भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज २४ ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळवला जाईल. पहिला कसोटी सामना जिंकत किवी संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने २ सामने पुण्यात खेळले आहेत. त्यात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. कोहलीने या दरम्यान ३ डावांत २६७ धावा केल्या. त्याचा बेस्ट स्कोर नाबाद २५४ इतका आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ही खेळी केली होती. ऑक्टोबर २०१९मध्ये हा सामना भारताने एक डाव आणि १३७ धावांनी जिंकला होता.
अशातच दुसरा कसोटी सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत संघाला जिंकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. जर त्यांची बॅट चालली तर जबरदस्त रेकॉर्ड बनू शकतात.
ऑस्ट्रेलियाने दिली होती मात
पुण्याच्या मैदानावर भारताने पहिला कसोटी सामना २०१७मध्ये खेळला होता. ऑस्ट्रेलियाने त्या सामन्यात भारताला ३३३ धावांनी हरवले होते. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिल्या डावात १०५ आणि दुसऱ्या डावात १०७ धावांवर ऑलआऊट झाला होता.
आफ्रिकेचा केला पराभव
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दोन वर्षांनी भारतीय संघाने आणखी एक सामना पुण्याच्या मैदानावर खेळला होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्धहोता. भारताने पहिल्यांदा बॅटिंग करताना ५ बाद ६०१ धावा केल्या होत्या. तर आफ्रिकेचा संघ २७५ आणि १८९ धावांवर बाद झाला होता. यात भारताने एक डाव १३७ धावांनी विजय मिळवला होता.






