केंद्र सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत दिवाळीच्या मुहूर्तावर १ लाख ८४ हजार ३९ लाभार्थ्यांना मोफत एलपीजी सिलिंडरचा लाभ देणार आहे. ग्राहकांना गॅस सिलिंडरची संपूर्ण रक्कम रोखीनं भरावी लागणार आहे. त्यानंतर इंधन कंपन्यांकडून तीन ते चार दिवसांत अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल.
या योजनेचा लाभ फक्त त्या ग्राहकांना मिळणार आहे ज्यांचे आधार ऑथेंटिकेशन पूर्ण झालं आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख १९ हजार ६६७ ग्राहकांची नोंदणी झाली असून, त्यापैकी १ लाख ८४ हजार ३९ ग्राहकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे झाली आहे. तर ३५ हजार ६२८ ग्राहकांचं आधार ऑथेंटिकेट झालेलं नाही आहे. यासाठी डीएसओने सर्व गॅस एजन्सींना लाभार्थ्यांचे १०० टक्के आधार ऑथेंटिकेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मोफत सिलिंडरची दोन वेळा योजना
होळी आणि दिवाळीच्या सणाला केंद्र सरकारनं दोनवेळा फ्री गॅस सिलिंडर देण्याची योजना आखली आहे. ग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधून आधार ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
ज्या लाभार्थ्यांची बँक खाती आधार कार्डशी जोडली गेलेली आहेत आणि ज्यांचं आधार ऑथेंटिकेट झालं आहे तेच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या योजनेच्याअंतर्गत १४.२ किलोचा सिलिंडर मोफत दिला जाणार आहे. ग्राहकांना याबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया डीएसओ शिवी गर्ग यांनी दिली.
२०१६ मध्ये योजनेची सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सुरुवात केली होती. मोफत एलपीजी सिलिंडर कनेक्शन ग्रामीण भागातील घरांना देणं हा या योजनेचा उद्देश आहे. १० कोटी लोकांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेचा ग्रामीण भागातील महिलांना मोठा फायदा झालाय. वर्षभर महिलांनी एलपीजी गॅस वापरावा यामुळे त्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर दिला जातो. तसंच गॅस जोडणीशी संबंधित इतर आवश्यक वस्तूही खरेदी करता याव्यात यासाठी कनेक्शन घेतल्यास १६०० रुपयांचं अर्थसहाय्यसुद्धा दिले जाते. सरकार गॅस स्टोव्ह खरेदी करण्यासाठी ईएमआयची सुविधाही देते.