१५० हून अधिक गाड्या रद्द, ओडिशातील कोणार्क मंदिर राहणार बंद
नवी दिल्ली : दाना चक्रीवादळ (Cyclone Dana) शुक्रवारी पहाटे भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि ओडिशातील धामरा बंदरादरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने बुधवारी सांगितले.
पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावरील दाना चक्रीवादळ वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचे गुरुवारी (दि.२४) पहाटे वायव्य बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दाना चक्रीवादळ २४ ऑक्टोबरची रात्र ते २५ ऑक्टोबरच्या पहाटे दरम्यान भीतरकनिका आणि धामारा (ओडिशा) जवळ पुरी आणि सागर बेटांदरम्यान उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालची किनारपट्टी ओलांडून पुढे जाऊ शकते. यावेळी वाऱ्याचा वेग प्रतितास १००-११० किमी राहील. वाऱ्याचा वेग प्रति तास १२० किमी पर्यंत वाढू शकतो, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या दाना चक्रीवादळ पारादीप (ओडिशा) च्या आग्नेय ५२० किमी, सागर बेटाच्या (पश्चिम बंगाल) ६०० किमी आग्नेय आणि खेपुपारा (बांगला देश) च्या ६१० किमी दक्षिण-पूर्वेस घोंघावत आहे.
१५० हून अधिक गाड्या रद्द, कोणार्क मंदिर बंद
भारतीय हवामान विभागाने मच्छिमारांना २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच दक्षिण रेल्वेने ‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सेलम, इरोड, तिरुपूर आणि कोईम्बतूर मार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान धावणाऱ्या १५० हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. भारतीय तटरक्षक दल अलर्टवर आहे. संभाव्य बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफच्या १३ तुकड्या दक्षिणेकडील भागात तैनात करण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळामुळे २४ आणि २५ ऑक्टोबरला ओडिशातील कोणार्क मंदिर बंद राहणार आहे.