पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच दाना चक्रीवादळ (Dana Cyclone) सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात आज काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस (Rain Alert) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात असलेले अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आज सकाळी साडेपाच वाजता दाना चक्रीवादळ ओडिशातील धामरा बंदरादरम्यान किनारपट्टीवर धडकणार आहे. हे चक्रीवादळ पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर १६.५ डिग्री उत्तर अक्षांश तर ८९.६ डिग्री पूर्व रेखांशावर स्थित आहे. आज सकाळी वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आज राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या चारही उपविभागांमध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात सुद्धा आजपासून तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र, पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मेघगर्जना व विजांच्या कडकडाट होऊन ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.