मालेगाव : तालुक्यातील सायने बुद्रुक शिवारात मालेगाव तालुका पोलिसांनी कारमधून दोन गावठी कट्ट्यांसह २७ जिवंत काडतुसे, दोन चॉपर आदी शस्त्रे जप्त करून नाशिकच्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी शाकीर नासीर पठाण (रा. नंदनवन चौक, उत्तमनगर, सिडको, नाशिक) व मोहम्मद अन्वर सैय्यद (रा. नानावली, द्वारका, नाशिक) यांच्याविरुद्ध तालुका पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. तालुक्यातील सायने बुद्रुक शिवारात चाळीसगाव फाटा येथे तालुका पोलिस वाहनांची तपासणी करत होते.
यावेळी संशयित टोयोटा अल्टीस कारची (एमएच ०२, सीबी ३१७८) तपासणी केली.
यावेळी शाकीर याच्याजवळ ६० हजारांचे एक देशी बनावटीचा नवीन स्टेनलेस स्टीलचा स्वयंचलित कट्टा तर दुसरा संशयित मोहम्मद अन्वर याच्याजवळ दीड हजारांचा साडेतेरा इंच लांबीचा स्टीलचा चॉपर मिळून आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांना दमदाटी करून पुढे असलेल्या एका कारला पाठीमागून धडक देत वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी दोघांना गाडीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहनाची पोलिसांनी कसून तपासणी केली असता, ६० हजारांचा अन्य एक स्टिलचा देशी स्वयंचलित कट्टा, तसेच १३ हजार ५०० रुपयांचे २७ जिवंत काडतुसे, वीस इंच लांब चॉपर मिळून आला.