Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीवांद्रे येथील बॉलीवूड थीम पार्कच्या कामाला वेग

वांद्रे येथील बॉलीवूड थीम पार्कच्या कामाला वेग

मुंबई (प्रतिनिधी): वांद्रे पश्चिम येथील बॉलीवूड थीम पार्क उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच या बॉलीवूड थीम पार्कच्या कामाला सुरुवात झाली असून कामाने वेग घेतला आहे. लवकरच हे थीम पार्क पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या थीम पार्कच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास जाणून घेण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे.

एमएमआरडीए उभारत असलेली २३.६४३ किमी लांबीची ‘मेट्रो २ ब’ मार्गिका एस. व्ही. रोडवरून जात आहे. एस.व्ही.रोड परिसरातील पाली हिल, कार्टर रोडसारख्या ठिकाणी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गायक आदी मंडळी वास्तव्याला आहेत. या परिसरात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. या पार्श्वभूमीवर भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास मेट्रो मार्गिकांच्या खांबावर, मेट्रो मार्गिकांखालील रस्त्यावर रेखाटून पर्यटकांना, नागरिकांना आकर्षित करण्याची संकल्पना स्थानिक आमदार ॲड आशिष शेलार यांनी एमएमआरडीएसमोर मांडली होती.

त्यांच्या संकल्पनेनुसार एमएमआरडीएने २०० कोटी रुपये खर्च करून मेट्रो मार्गिकेखाली बॉलीवूड थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील ईएसआयसी नगर–वांद्रे पश्चिमदरम्यान एकूण सात मेट्रो स्थानकांखालील ३५५ खांबांमधील मोकळ्या जागेवर हे थीम पार्क उभारण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये शेलार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली असून आता कामाने वेग घेतला आहे. शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर या थीम पार्कमध्ये केला जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -