मुंबई : चटकदार पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. आता अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात प्रेक्षकांना चाखायला मिळणार (Panipuri Movie) आहे. नर्म विनोदी, खेळकर पद्धतीने जीवनदर्शन घडवत जोड्यांच्या प्रेमाची परिणीती आणि त्यांचा प्रवास भविष्यामध्ये कशाप्रकारे होतो याची गमतीशीर कथा या ‘पाणीपुरी’ चित्रपटामध्ये दाखवली जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मजेशीर टिझर रिलीज झाला असून प्रेक्षकांनी भन्नाट प्रतिसाद दिला आहे.
लेखन-दिग्दर्शन रमेश चौधरी आणि एस.के प्रॉडक्शन निर्मित ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटामध्ये अभिनेता कैलास वाघमारे, हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब, अभिनेते भारत गणेशपुरे-प्राजक्ता हनमघर, ऋषिकेश जोशी अभिनेत्री प्रतीक्षा जाधव, सचिन बांगर-अनुष्का पिंपूटकर हे तरुण चेहरे यात धमाल करणार आहेत. त्याचबरोबर अभिनेता मकरंद देशपांडे, सायली संजीव, विशाखा सुभेदार हे अनुभवी कलाकार देखील कथेत जबरदस्त रंग भरणार आहेत.
संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते असून चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत.