काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना फटकारले
मुंबई :पंख छाटण्याचा प्रश्नच नाही,मीच थोरातांना ठाकरे अन् पवारांकडे पाठवले,असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. दरम्यान, जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत नाना पटोले आणि उबाठा सेनेत खडाजंगी सुरु असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे जागावाटपावर चर्चेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मीच पाठवले असल्याचे स्पष्ट केले.
यावर बोलताना नाना पटोले म्हणाले,महाविकास आघाडीचा जागावाटपावर तोडगा आजच निघायला हवा,अशीच आमचीही इच्छा आहे. जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी मीच बाळासाहेब थोरात यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठवले होते. जागांबाबत अदलाबदल होऊ शकतो, असा संदेश थोरात यांनी आणला आहे. त्यानंतर आता जागावाटपावर बैठक होणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
माझे पंख छाटल्याचा प्रश्नच येत नाही. माझे पंख छाटलेले नाहीत, आमच्यापेक्षा तुम्ही महायुतीचा सागर बंगल्यावर आणि एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर काय चाललंय, कसे कपडे फाडले जात आहेत, ते दाखवा. तुम्हाला आग लावण्याशिवाय दुसरं कामच नाही, या शब्दांत पटोले यांनी माध्यमांना फटकारले.