मुंबई : काही दिवसांपासून राज्यभरात धूमाकूळ घातलेल्या परतीच्या पावसाचा (Maharashtra Rain) जोर ओसरत चालला असल्याचे दिसून येत आहे. तर अजूनही काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या काही दिवसांत परतीचा पाऊस गायब होणार असून नागरिकांना गुलाबी थंडीची (Cold weather) चाहूल लागणार आहे.
येत्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असून त्यानंतर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले.
कधीपासून पसरणार थंडीची चादर?
१ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीची चादर पसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. तर येत्या आठवडाभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला या भागात थंडीला सुरुवात होईल.
या कालावधीत असणार पावसाची उघडीप
उद्यापासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते. २६ ते २९ दरम्यान दक्षिण महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार दिवसात दक्षिण नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.