Sunday, December 15, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यगुन्हेगारांची मानसिकता

गुन्हेगारांची मानसिकता

आपल्यावर अन्याय झाला म्हणजे आपण स्वतः गुन्हेगार होणे योग्य नाही. जाणून घ्या गुन्हेगारांची मानसिकता…आपण अनेकदा बघतो की कुटुंबात, समाजात सगळीकडेच एकमेकांवर अन्याय, अत्याचार, अपमान, छळ, चूक नसतानाही त्रास सहन करावा लागणे हे होत असते. कोणतेही घर, कोणतीही व्यक्ती, कोणताही समाज याला अपवाद नाही. हा त्रास अगदी आपल्या लहानपणापासून झालेला असतो, तर कधी अगदी आपण वयोवृद्ध होईपर्यंत इतरांच्या चुकांची शिक्षा भोगत असतो. अनेकदा आपण आपल्याला झालेला त्रास, आपल्यावर कोणीही केलेला अन्याय, अत्याचार यामुळे खूप छळ, मनस्ताप, मान हानी, आर्थिक नुकसान सहन केलेले असते. अनेकदा भलत्याच व्यक्तीच्या चुकीमुळे अनेक कुटुंब, घराणे उद्ध्वस्त झालेले असते. पुढील पिढीचे नुकसान, घरातील लोकांची भावनिक, मानसिक हानी झालेली असते.

– मीनाक्षी जगदाळे

माजात जेव्हा आपण कोणतेही गुन्हे घडताना पाहतो, मग ते वैयक्तिक पातळीवर केलेले असोत, सामुदायिक स्वरूपात केलेले असोत, वैयक्तिक द्वेष, चीड आणि वैमानस्यातून घडलेले असोत, कोणत्याही जात, धर्म, पंत, प्रांत, पक्ष यांच्यामधील तेढ असो यामागे एकमेकांप्रति खूप खोलवर रुजलेला, खूप जुना साठून असलेला राग ठासून भरलेला असतो. आपण सगळ्यांनी अन्यायाविरुद्ध जरूर लढावे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा चुकीचा असतो असे आपण कायम म्हणतो. व्यक्ती कोणीही असो, कितीही सुशिक्षित असो, गरीब असो श्रीमंत असो, लहानपणापासून आपल्यावर झालेले संस्कार, आपल्याला इतरांकडून मिळालेली माहिती, आपल्याला ठासून सांगण्यात आलेले विचार, आपल्यावर बिंबलेल्या घटना मग त्या कितपत सत्य-असत्य, योग्य-अयोग्य याची शहानिशा न करता एखाद्याबद्दल आपले बनवले गेलेले मत यातूनच आपल्याला कोणाहीबद्दल प्रचंड तिरस्कार, द्वेष हा निर्माण होत असतो आणि दिवसेंदिवस तो वाढत असतो.

आपण स्वतःच्या मनाने बुद्धीने विचार करायला सक्षम झाल्यावर पण परत कोणत्या प्रकारच्या लोकांच्या संगतीत येतो, आपल्यात खुनशी वृत्ती, दुश्मनी, बदल्याची भावना, बेरडपणा, निगरगट्टपणा फोफावतो की कितीही नकारात्मक परिस्थितीमधून आपण स्वच्छ, नैतिकतेचा, चारित्र्य संपन्न मार्ग स्वीकारण्यासाठी आपल्यात आत्मविश्वास आणि वैचारिक प्रगल्भता कितपत येते यावर आपण गुन्हेगारीकडे वळणार आहोत की एक सर्वसामान्य व्यक्ती चारित्र्यवान व्यक्ती म्हणून, समाजाचा जबाबदार घटक म्हणून राहणार आहोत हे ठरते. आज समाजात फोफावत चाललेला हिंसाचार, भ्रष्टाचार, आत्महत्या, घात पात, खून, धमक्या, ब्लॅकमेलिंग, मारहाणीच्या घटना, बलात्कार, वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक, आर्थिक गुन्हे का वाढत आहेत? या प्रकारे वर्तणूक करताना लोकांना कायद्याची, पोलिसांची भीती का वाटत नाही? ज्यांना आपण फसवतोय, ज्यांना त्रास देतोय तो देखील माणूस आहे, त्याला पण कुटुंब आहे, त्याला पण समाजात प्रतिष्ठा आहे. मुलं-बाळं घरदार आहे हे आपण विसरून जातो आणि फक्त आपण गुन्हा करूनही कसे निष्कलंक आहोत याचे समर्थन करत असतो. आपण ज्याला फसवतो, ज्याच्यावर अन्याय, अत्याचार, मारहाण अथवा काहीही त्रासदायक करतो तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाला काय भोगावं लागतं याचा थोडाही विचार गुन्हेगार करत नाही.

स्वतःच्या मनाला, स्वतःच्या कुटुंबाला, आपण राहतो त्या समाजाला फसवताना, कुकर्म करताना गुन्हेगारीच्या वाटेवर वळताना लोकांना काहीच का वाटत नाही? या मागे त्यांची काय मानसिकता असते? गुन्हेगार तयार होण्यामागील सायकोलॉजिकल कारण काय यावर आपण जाणून घेऊयात. सोसोओपॅथी आणि सायकोपॅथी हे दोन घटक ठरवतात की एखादी व्यक्ती गुन्हेगारीकडे वळेल की नाही? या दोन प्रवृत्ती आपल्यामध्ये किती प्रमाणात आहेत या ठरवण्याचं कामं आपल्या मानसिकतेमधील काही मूलभूत घटक ठरवतात. कितपत आणि कितीवेळा एखादी व्यक्ती कोणत्या स्वरूपाचा गुन्हा करण्याची मानसिकता ठेवते हे त्याच्या मानस शास्त्रावरच अवलंबून असते. नार्सिंसिजम (आत्म प्रीती वाद) Machiavellianism (उपपती)saradin froid (विवादास्पद) आणि sadism (दुसऱ्याच चांगला झालेला पाहून आनंद होणे) या चार वृत्ती आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये किती प्रमाणात आहेत यावरून आपल्यात कुठली मानसिकता जास्त घर करू शकते हे ठरते. आपल्याला आपल्या घरात, ओळखीत, समाजात कुठेही या वृत्तीची तीव्रता असलेले लोक असतील तर आपण त्यांना वेळीच आवरणे, सावरणे आवश्यक आहे. अशा व्यक्तीच्या छोट्या छोट्या वागणुकीतून, स्वभावातून, त्यांच्या जीवनात ते काय करतात, कसे जगतात त्यांनी सर्व प्रथम छोट्यातला छोटा अन्याय कोणावर केला? सर्वात पहिली फसवणूक कोणाची केली? हिंसाचार कुठे केला, कोणासोबत केला हे विचारात घेणे आवश्यक आहे.

दुर्दैवाने गुन्हेगारांचे समुपदेशन करताना खूपदा हेच लक्षात येते की, त्यांच्या अशा वृत्तीची सुरुवात त्यांच्या घरातूनच त्यांनी केलेली असते, दाखवलेली असते. त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केल्याने, त्याची बाजू सावरल्याने, त्याला पाठीशी घातल्याने किंवा भावनिक होऊन त्याचा विचार केल्याने पुढे हीच व्यक्ती घराबाहेर पण आपला तोच स्वभाव, तीच शैली, तोच खोटेपणा, लबाडी वापरून समाजात गुन्हे करताना आणि समाजाला उद्ध्वस्त करताना दिसते. अनेकदा असे पाहायला मिळते की, ज्या व्यक्तीमध्ये हे वरील घटक जास्त असतात त्या व्यक्ती गुन्हेगारी वृत्तीकडे वळण्याची शक्यता अधिक असते. बालपणी पालकांकडून झालेले दुर्लक्ष, लहानपणी सहन करावी लागलेली शारीरिक, भावनिक, मानसिक पिळवणूक, योग्य संस्कार न् मिळणे, बालपणी खूप अत्याचार, अन्याय, अपमानित होणे अशा गोष्टी घडल्या असतील तरी ही मुलं मोठी होऊन गुन्ह्यात पटकन ओढली जातात. झटपट पैसा मिळवणे, कष्ट करण्याची तयारी नसणे, खोटा मोठेपणा, रुबाब, श्रीमंती याच्या चुकीच्या कल्पना डोक्यात असणे या गोष्टी पुढे जावून कोणाच्याही मानसिकतेवर नकारात्मक परिणाम करत असतात. अनेकदा अशा व्यक्तिमत्त्वामध्ये, त्याच्या स्वभावात recidivism नावाचा घटक असतो. ज्यामुळे एकदा गुन्हा करून, त्यात पकडले जावून, त्याची शिक्षा भोगून देखील परत परत तोच गुन्हा करण्याची वृत्ती त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेली असते. यामुळे स्वतःला बदलून चांगल्या मार्गावर आणण्याची वृत्ती नाहीशी होते आणि स्वभावातील नकारात्मकता वाढत जाते.

सर्वसामान्य व्यक्तीला वाटते एखादा चोरी, घरफोडी करून तुरुंगात राहून आला, आता तो सुधारणार, त्याला पच्छाताप होईल, तो झालेल्या शिक्षेमुळे बदलेल पण दुर्दैवाने तसे न् होता भविष्यात तो अधिक मोठ्या चोऱ्या करू लागतो. एकदा तुरुंगात जावून आल्यावर पण त्याची मानसिकता का बदलत नाही? तर तिथे तो अनेक प्रकारच्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना भेटतो, तिथे त्याला गुन्हेगारी क्षेत्रामधील अधिक माहिती आणि ज्ञान मिळते. जास्तीत जास्त काय होतं, कायदा कसा कामं करतो, जामीन कसा मिळतो हे अट्टल गुन्हेगार पूर्ण अभ्यासून असतो. त्यातून तुरुंगातील संगत त्याचा आत्मविश्वास, बेरडपणा वाढवून त्याची नजर मरते, भीड चेपते.

खूप क्वचित असे होते की, एकदा एका गुन्ह्यात शिक्षा भोगल्यावर ती व्यक्ती फिरून आयुष्यात परत चुकीच्या मार्गाला जात नाही. अन्यथा एक गुन्हा केला काय आणि दहा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केले तर काय कलम बदलतील, शिक्षेचा कालावधी बदलेल पण आपला हेतू तर साध्य होईल, आपल्याला जे हवं ते मिळवता येईल, जे करायचं ते करता येईल अशी भूमिका तयार होते. पकडले जाऊ तेव्हा बघता येईल तोपर्यंत तरी मनाप्रमाणे जगून घेऊ, कायद्याच्या पळवाटा शिकून घेऊ. गुन्हेगारी वृत्ती असलेल्या लोकांचे आदर्श पण त्याच क्षेत्रातले किंवा त्या सारखेच गुन्हे केलेले इतर लोक असतात. समुपदेशन दरम्यान लक्षात येते की, दुसऱ्या आपल्यापेक्षा मोठ्या, कुविख्यात अथवा प्रतिष्ठित पण ज्याने गुन्हा करून तो त्यातून सहीसलामत सुटला, त्याचं कोणीच काही बिघडवू शकलं नाही, त्याला शिक्षा झाली नाही, कमी शिक्षा झाली अथवा सगळीकडेच असे गुन्हे घडतात, खूप लोकं असंच करतात या प्रकारचे समर्थन गुन्हेगार देताना दिसतात. ज्यांनी मोठे मोठे गुन्हे केले, जे त्यामुळे खूप प्रसिद्धीच्या झोतात आले किंवा ज्यांच्या भोवती खूप वलंय आहे, ज्यांचं गुन्हेगारी क्षेत्रात नाव आहे, ज्यांना सगळे घाबरतात, ज्यांची दहशत आहे असे लोकं नव्याने उदयाला येणाऱ्या गुन्हेगारांना खूप प्रेरणादायी वाटतात. आदर्शच चुकीचे असल्यामुळे त्यांना आपण पण काहीही करून त्यातून बाहेर पडू शकतो, हा चुकीचा, आत्मविश्वास निर्माण होतो आणि कायदा-सुव्यवस्था फाट्यावर मारण्याची त्यांची वृत्ती फोफावली जाते. यामुळे एकदा गुन्हा करून त्याचे परिणाम भोगून पण व्यक्ती परत परत ती गोष्ट करत राहते आणि कालांतराने आपण जे करतोय ते चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे, हानिकारक आहे, अनैतिक आहे ही जाणीव नाहीशी होत जाते.

याबरोबरच मागील लेखात सांगितल्याप्रमाणे जर अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणारे लोकं त्यांच्या आजूबाजूला अथवा संपर्कात असतील तर त्यांना घरातही धाक राहत नाही आणि आपण काही चुकीचं करतोय हा विचार पण त्यांना येत नाही. तरी आपण सगळ्यांनी हेच लक्षात घेतलं पाहिजे आपण कोणाच्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत नाही न्? आपल्याला त्यातून काही फायदा होतोय म्हणून स्वार्थी भावनेने आपण एखादा गुन्हेगार घडवत नाही न्? याचबरोबर आपला वापर कोणी कोणतेही प्रलोभण दाखवून चुकीच्या कामासाठी करत नाही न्, पावलोपावली आपण जे करतोय ते नीतिमत्ता आणि कायदा याला धरून आहे का हे पडताळून घेणे एक सुजाण नागरिक म्हणून आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -